लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

वृत्त साभार: तरुण भारत मुंबई

पुणे: संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ’जग बदलणारा बाप माणूस’ या विक्रमी पुस्तकाचे लेखक श्री. जगदीश ओहोळ यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थिती लावली. तसेच ज्येष्ठ साहित्यिक श्री. हणमंत पडवळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाज सुधारक गाडगे महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करुन व संविधानाची प्रतिज्ञा वाचून या सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर निमंत्रित कवींचे कविसंमेलन झाले. अनेक कवींनी अतिशय ओघवत्या वाणीने कविता सादर केल्या. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला. साहित्यिक जयेश मेस्त्री यांच्या ’सावधान’ या बालनाट्याच्या पुस्तकाला ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ प्राप्त झाला. जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सावधान हे बालनाट्य मोबाईलच्या अतिवापरामुळे होणार्‍या दुष्परिणामांवर भाष्य करणारे व त्यातून सुटका मिळवण्यावर आधारित आहे. याआधी स्पर्धांमध्ये या नाट्याचे सादरीकरण देखील झाले आहे.

जयेश मेस्त्री हे लेखक, साहित्यिक, कवी आणि विश्लेषक असून गेली २० वर्षे साहित्य क्षेत्रात योगदान देत आहेत. त्यांची विविध विषयांवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच स्टोरी टेल मराठी या ऍपवर त्यांच्या विविध कथा व ऑडिओ सीरीज प्रसिद्ध झाल्या आहेत आणि रसिकांनी या कथांना भरभरुन प्रतिसाद दिला आहे. तसेच गेली २० वर्षे रंगकर्मी म्हणून ते रंगमंचाची सेवा करत आहेत. बालनाट्य शिबिर, लेखन शिबिर इ. च्या माध्यमातून तरुण व बाल कलाकार घडवण्यावर श्री. जयेश मेस्त्री भर देत आहेत. फिल्म सेंसॉर बोर्ड येथे सल्लागार सदस्य आणि वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन समिती अशा सरकारी समित्यांवर त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

“संत गाडगे महाराज यांनी रस्त्यावरील कचरा स्वच्छ केला. तसेच लोकांच्या मनातील जातीभेद, अस्पृश्यता नामक जो कचरा साचला होता, तोही स्वच्छ केला आहे. गाडगे महाराज हे महाराष्ट्राचे थोर संत, साहित्यिक आणि सामाजिक सुधारक आहेत. अशा महान व्यक्तीच्या नावाने पुरस्कार मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. आता जबाबदारी आणखी वाढली आहे. अनेक उत्तमोत्तम साहित्य निर्माण करुन समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची मी प्रतीज्ञा घेत आहे. मला पुरस्कार दिल्याबद्दल मी आयोजकांचा ऋणी आहे.” असे मत श्री. जयेश मेस्त्री यांनी व्यक्त केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *