शाळकरी मुलांसाठी लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त म्हणावयाचे भाषण – टिळकांची उत्सवांतून जनजागृती

शाळकरी मुलांसाठी लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त म्हणावयाचे भाषण – टिळकांची उत्सवांतून जनजागृती

(हे भाषण उत्सव किंवा स्पर्धांमध्येही म्हणू शकता.)

देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी योगदान दिले आहे. पण या सर्वांमध्ये लोकमान्य ही पदवी केवळ बाळ गंगाधर टिळक यांनाच मिळाली. लोकमान्य म्हणजे लोकांनी मान्य केलेला नेता. गांधी युगाचा आरंभ होण्याआधी लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी भारताचं नेतृत्व केलं. टिळकांचं वैशिष्ट्य असं की ते स्वतः सशस्त्र क्रांतिकारक नसले तरी त्यांनी सशस्त्र क्रांतिकारकांना पाठिंबा दिला. चापेकर बंधू, सावरकर हे महत्वाचं उदाहरण आहे.

लोकमान्यांनी दोन मोठे सार्वजनिक उत्सव सुरु केले. शिवजयंती आणि गणेशोत्सव. खरं पाहता शिव जयंती रानडे व त्यांच्या काळातील नेत्यांनी सुरु केली होती. पण या शिवजयंतीला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरुप लोकमान्यांनी प्राप्त करुन दिले. देशाला स्वतंत्र करायचे असेल तर आधी आपल्यात असलेले जातीभेद मिटवावे लागतील हे टिळकांनी ओळखलं होतं. सर्व भारतीयांना एकत्र आणायचं असेल तर गणपती बाप्पा हा सर्वांना लाडका देव आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आदर्श. म्हणूनच शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरु करुन त्यांनी सर्व जातीतील लोकांना एकत्र आणलं.

या गणेशोत्सवामध्ये आणि शिवजयंती उत्सवामध्ये अनेक कार्यक्रम सादर केले जायचे. इंग्रजांना दोन्ही बाजूंनी पराभूत करायचं आहे. म्हणजेच बुद्धीने आणि शस्त्राने. हे ओळखून कुस्ती, दांदपट्टा, तलवारबाजी अशा मैदानी खेळांतून गुपचूप शस्त्र शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जायचं. दुसरीकडे अनेक तरुण देशाभिमानाच्या कविता, पोवाडे सादर करायचे. भाषणे द्यायचे. शिव जयंती उत्सवातला टिळकांचा एक किस्सा खूपच गाजला आहे. उत्सवामध्ये भगवे झेंडे मिरवण्यासाठी काठीचा उपयोग केला जायचा. एकदा इंग्रजांनी कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला तर कार्यकर्त्यांनी झेंडे गुंडाळले आणि झेंड्याच्या काठीनेच इंग्रजांना मारहाण केली.

हे देखील वाचा:
“मी पण मोबाइल”… १ ली ते ५ वी पर्यंत स्पर्धेत लहान मुलाला करण्यासारखी स्क्रिप्ट!

म्हणून पुढच्या वर्षी इंग्रजांनी मिरवणुकीत काठ्या वापरायच्या नाहीत असा आदेश काढला. कार्यकर्ते टिळकांकडे आले आणि म्हणाले काठी वापरायची नाही तर झेंडा कसा लावायचा. टिळक प्रचंड बुद्धिमान होते. ते म्हणाले, अक्कल काय गोर्‍या लोकांनाच आहे काय? आम्हा भारतीयांकडेही खूप अक्कल आहे. कार्यकर्त्यांना कळेना, टिळकांना नेमकं काय म्हणायचंय ते. मग दुसर्‍या दिवशी मिरवणुकीत झेंडे फडकताना दिसले. इंग्रजांनाही प्रश्न पडला की काठीवर बंदी घातली तर झेंडे कशावर लावलेत. तेव्हा त्यांना कळलं की ऊसावर झेंडे लावले होते. ऊस आणू नका असं इंग्रजांनी सांगितलं नव्हतं. आणि अशाप्रकारे इंग्रजांना कळलं होतं की आपण टिळकांचा पराभव करुच शकत नाही. म्हणून तर त्यांना पुढे मंडालेला धाडलं…

आज मात्र गणेशोत्सवाचं स्वरुप बदलतंय. डीजेवर घाणेरड्या गाण्यांवर नाचणारे कार्यकर्ते पाहिले तर आपल्या हाताच्या मुठी आवळल्या जातात. माझ्यासारख्या लहान मुलाला हे कळतं पण या मोठ्या लोकांना का कळत नसेल? मला तर कधीकधी या सर्व काकांना सांगावसं वाटतं की “अरे काकांनो, हा असला मूर्खपणा करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरु केला होता काय?”

पुन्हा एकदा या सर्व सार्वजनिक उत्सवांना देशाभिमानाचं स्वरुप प्रदान केलं पाहिजे. या उत्सवांमध्ये देश कल्याणाची चर्चा झाली पाहिजे. आपण एकत्र येऊन समाजाचा अणि देशाचा विचार केला पाहिजे. मग आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही. हीच लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली असेल.

जय हिंद… लोकमान्य टिळकांचा विजय असो.

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *