नव्वदोत्तर काळातील मराठी चित्रपट, कथा, नाटक इत्यादी माध्यमातून दलित, वंचित व महिलांचे चित्रण

नव्वदोत्तर काळातील मराठी चित्रपट, कथा, नाटक इत्यादी माध्यमातून दलित, वंचित व महिलांचे चित्रण

(२० वे समरसता साहित्य संमेलन, नांदेड येथे २ ऑगस्ट २०२५ रोजी केलेले भाषण)

उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिक श्रोतेहो,

“अक्कोधेन जिने कोधं, असाधुं साधुना जिने; जिने कदरियं दानेन, सच्चं जिने मुसावादं।”

“क्रोधावर संयमाने विजय मिळवावा, दुष्टतेवर सज्जनतेने मात करावी; कंजूषपणावर दानाने नियंत्रण ठेवावे आणि असत्याचा पराभव सत्याने करावा.” धम्मपद (श्लोक २२३)

श्रोतेहो, दलित साहित्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार आणि तत्वज्ञान यांचा पगडा आहे. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, वैचारिक लिखाण, संविधान निर्मिती या सर्व गोष्टींमुळे दलित समाजामध्ये आत्मभान निर्माण झाले, अनेक वर्षे अस्पृश्यतेचा बाण लागून मुर्छित पडलेल्या समाजाला जणू संजीवनी प्राप्त झाली आणि त्यांच्यामध्ये लढवैय्येपणाची भावना निर्माण झाली. आणि म्हणूनच दलित साहित्यामध्ये आपल्यावर होत असणार्‍या अन्यायाची जाणीव दिसते. चीड, संताप, विद्रोह, नकार, वेदना दिसून येतात. इतकी तीव्र भावना दुसर्‍या कोणत्याही साहित्यात आपल्याला दिसून येत नाही. आणि याचा प्रभाव नाटक व सिनेमांवरही पडला आहे.

आजवर समाज हा अनेक स्तरांत विभागला गेलेला होता – जात, वर्ग, लिंग, भाषा… आणि ही विभागणी केवळ सामाजिक नव्हे, तर मानसिकही होती. पण १९९० नंतरचा काळ हा भारतासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी एका नव्या सामाजिक जागृतीचा काळ ठरला. उदारीकरण आलं, शहरीकरण वेगानं झालं, प्रसारमाध्यमं फोफावली. सोशल मीडिया आला. १९९० चा काळ हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा काळ आहे. आज आपण एआयच्या जगात जगतोय. आणि म्हणूनच समाजाच्या उपेक्षित गटांनी – दलितांनी, वंचितांनी, स्त्रियांनी – आपला आवाज बुलंद केला. विशेष बाब म्हणजे या आवाजाला कलाक्षेत्रात – साहित्य, रंगभूमी आणि सिनेमा यामध्ये स्थान मिळू लागलं. याआधी जे हळूवार कुजबुजत होते, ते आता थेट आणि स्पष्ट बोलू लागले. मराठी साहित्य हे नेहमीच प्रगतीशील राहिलं आहे. पण ९० नंतरचं दलित साहित्य हे फारच वेगळं होतं. ते केवळ करुणेची कथा सांगत नव्हतं, तर अस्तित्वासाठीचा संघर्ष आणि आत्मसन्मानासाठीचा उठाव करत होतं. १९९० दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीवर विनोदाचा प्रभाव खूप होता. त्या काळात क्वचितच रोमॅंटिक किंवा इतर जॉनरचे चित्रपट निर्माण झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांनी विनोदी चित्रपट निर्मितीवर अधिक भर दिला. अर्थात जे खपतं ते चालवून घेतलं जातं. मात्र हिंदी प्रमाणे मराठीत फार मोठा समांतर चित्रपटांचा प्रवाह पाहायला मिळत नसला तरी जब्बार पटेलांनी हा समांतर चित्रपटांचा प्रवाह सुरु ठेवला असं म्हणायला हरकत नाही. १९९१ मध्ये त्यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” ही डॉक्युमेंटरी निर्माण केली. “एक होता विदुषक” हा तमाशा करणार्‍या वंचित समाजावर चित्रपट होता. पुढे “मुक्ता” इत्यादी चित्रपटांतून त्यांनी दलित जाणीव जोपासली.

नाटकांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर व्यावसायिक नाटकांपेक्षा प्रायोगिक नाटकांमध्ये दलित व वंचित जाणीव जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. यामध्ये प्रेमानंद गजवी यांचं नाव उल्लेखनीय आहे. सत्यशोधक, गांधी-आंबेडकर, किरवंत अशा नाटकांतून त्यांनी ही भावना जागृत ठेवली. जयंत पवार यांचं अधांतर हे नाटक वंचित समजल्या जाणार्‍या गिरणी कामगारांवर बेतलेलं आहे. अतुल पेठे यांचही नाव या चळवळीतल्या नाट्यकलावंतांमध्ये घ्यावं लागेल. पुढे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला यासारखी थेट भाष्य करणारी नाटकंही आली. एकांकिका उत्सवांमध्ये या प्रश्नांना उजाळा मिळाला आहे. “मड वॉक” नावाची गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारित नव्या दमाची एकांकिका युट्यूबवर आहे. ती प्रत्येकाने पाहायला हरकत नाही.

आता महिलांच्या प्रश्नांबाबत म्हणायचं झालं तर बिनधास्त, सातच्या आत घरात, न्यूड, सुमित्रा भावे यांचा दोघी, मी सिंधुताई सपकाळ, आनंदी-गोपाळ, पोस्टर गर्ल, बाईपण भारी देवा, झिम्मा, वजनदार, बकेट लिस्ट्स, गर्ल्स अशा अनेक चित्रपटांची नावे घेता येतील. नाटकांच्या बाबतीत कुसुम मनोहर लेले, अखेरचा सवाल, श्यामची मम्मी, खरं सांगायचं तर, शांतता कोर्ट चालू आहे, चारचौघी, काचेचा चंद्र अशी अनेक नाटके आहेत. महिलांचं अंतरंग सांगणारं आता सुरु असलेलं नाटक पाहायचं असेल तर देव बाभळी हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरेल. कारण यात मानवी स्त्रीची भावना तर आहेच पण त्याच बरोबर दैवी स्त्रीची भावनाही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पॉयझन्ड ब्रेड, आयदान असे अनेक साहित्य दाखवता येतील. पण मी “जग बदलणारा बाप माणूस” या जगदिश ओहोळ यांच्या पुस्तकाचा नक्कीच उल्लेख करीन.

या सर्व प्रकारांमध्ये विशेषतः कलेच्या अनुषंगाने आपले विचार कसे मांडायचे हे आजच्या काळात कुणाला कळलं असेल तर ते मला वाटतं की नागराज मंजुळे यांना कळलेलं आहे. पिस्तुल्या या शॉर्ट फिल्मपासून फॅंड्री, सैराट, पावसाचा निबंध अशा सर्वच कलाकृतींमध्ये नागराज मंजुळे यांनी जीव ओतला आहे. सैराटमधला वंचित समाजातला पश्या आणि प्रस्थापित समाजातली डॅशिंग आर्ची असो. यामध्ये दलित, वंचित आणि महिला अशा सर्व प्रश्नांना हात घातलेला आहे. किंवा फॅंड्रीमधला जब्या असो. ‘फँड्री’ ही एका दलित मुलाच्या आयुष्यातील प्रेमकथा. पण त्यामागे असलेली व्यवस्थेची क्रूरता आणि त्याच्या स्वप्नांवरचा बंधनाचा भार – हे सगळं आपल्याला इतकं अस्वस्थ करतं की, आपण अंतर्मुख होतो. अशा सिनेमांमधून आणि कलाकृतीतून आपण बघतो – की दलित पात्रं आता केवळ दयेची पात्रं राहिली नाहीत. ती अभिमानानं जगणारी, प्रेम करणारी, आणि अन्यायाच्या विरोधात उभी राहणारी पात्रं आहेत. ‘जोगवा’ चित्रपटात एक स्त्री देवदासी प्रथेच्या विरोधात उभी राहते, ती धार्मिकतेला नव्हे, तर अन्यायाला विरोध करते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या कथांमध्ये, साहित्यात, चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये – एक गोष्ट सतत जाणवते… ती म्हणजे, स्वत्वाचा शोध. हा शोध कोणत्याही एका समूहापुरता मर्यादित नाही. हा शोध आहे आपल्या सगळ्यांच्या सामाजिक समरसतेच्या प्रवासाचा.

फॅंड्री चित्रपट संपताना जेव्हा जब्या समाजावर गदड फेकून मारतो तो आजही आपल्या मनात रुतलेला आहे. श्रोतेहो, मला वाटतं की अन्याय, शोषण, विषमता यारुद्ध बंड पुकारणे आणि लोकशाही, मानवता, स्वातंत्र्य, बंधुता, समरसता अशा मानवी मूल्यांचा आग्रह धरणे हे केवळ दलित साहित्याचे किंवा स्त्रीवादी साहित्याचे नव्हे तर प्रत्येक साहित्याचे कर्तव्य आहे, प्रत्येक कलाकृतीचे दायित्व आहे. पण… पण हे सगळं करत असताना केवळ दुःख, वेदना, विद्रोह यामध्ये जगण्यासोबत आता २०२५ मध्ये जगत आहोत तर या जखमांवर आपण समाज म्हणून मलम लावलं पाहिजं. आपण एकत्रित येऊन, समरस होऊन या जखमा भरुन काढल्या पाहिजेत. आणि याद्वारे दलित, वंचित आणि महिलांचे साहित्य व कलाकृतींनी नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे कूच करावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. जब्याने फेकलेला दगड माझ्याही काळजात रुतलेला आहे पण माझी अशी इच्छा आहे की यापुढे जब्याने समाजावर गदड नव्हे तर फुलांचा वर्षाव करावा आणि समाजानेही जब्याला डोक्यावर घेऊन नाचावे. आणि ही सुरुवात प्रत्यक्षात होतंच आहे. मात्र साहित्यिक व कलाकार म्हणून आपली जबाबदारी वाढलेली आहे. आता आपल्याला समाजाला एकत्र करणारं साहित्य रचावं लागणार आहे, समाजाला समरस करणारी कलाकृती निर्माण करावी लागणार आहे.

समरसता म्हणजे केवळ बंधुभाव नव्हे, तर समज, स्वीकार आणि सहभाग. ही तत्त्वं केवळ भाषणात म्हणायची गोष्टी नाही – तर ही आपली भूमिका असली पाहिजे. आज दलितांचा संघर्ष, वंचितांचा आक्रोश, आणि स्त्रियांचा विद्रोह – हे सगळं फक्त त्यांचं नाही, तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या अंतर्मनात जागवलेलं प्रश्नचिन्ह आहे. आणि या प्रश्नाला उत्तर देण्याचं सामर्थ्य आहे आपल्या संस्कृतीमध्ये आहे, आपल्या लोकशाहीत आणि आपल्या साहित्य-कलांमध्ये आहे. “समरसता ही संकल्पना नव्हे, ती एक कृती आहे – आणि ती कृती साहित्य आणि कलेच्या माध्यमातून घडते, घडत राहिली पाहिजे.” श्रोतेहो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.” आपण शिकलो, संघटित झालो आणि संघर्षही केला. आता पुढचं पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. वेळ आली आहे समरस होण्याची. आणि माझी ही केवळ इच्छाच नव्हे तर खात्री देखील आहे. आपण एकत्र येऊ, समरस होऊ आणि महाराष्ट्राचा, भारताचा पुढचा काळ, येणारा काळ हा सुवर्ण काळ असणार आहे. आणि जसा जगन्नाथाचा रथोत्सव असतो, तसा समरसतेचा रथोत्सव निघेल, तेव्हा तो रथ खेचायला आपल्यासारखे साहित्यिक आणि कलावंत पुढे असतील. कारण हा बुद्धांचा देश आहे आणि गौतम बुद्ध म्हणाले होते,

“न हि वेरेण विराणी सम्मन्तीध कुदाचनं; अवेरेण च सम्मन्ति, एसा धम्मो सनन्तनो।” – धम्मपद (श्लोक ५)

या जगात द्वेषाने द्वेष कधीच शांत होत नाही. द्वेषाचा अंत फक्त द्वेषरहित भावनेने होतो. हीच सनातन धम्माची शिकवण आहे. हा एक शाश्वत नियम आहे.”

वक्ता: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *