खंडू रांगणेकर हा भारतीय क्रिकेटपटू होता. आजच्या पिढीला त्याचं नाव माहित नसावं. त्याला बर्याचदा राखीव खेळाडू म्हणूनच ठेवायचे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच सुरु होती. खंडू रांगणेकर राखीवमध्ये होता. त्यामुळे तो प्रेक्षकांमध्ये व्हिआयपी गॅलरीत बसलेला होता. तेव्हा त्याला एक बाई दिसली. ती भारतीय नव्हती. ती काहीतरी पुटपुटत होती. खंडू रांगणेकरची उत्सुकता जागी झाली. तो तिथून उठला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला.
त्याने तिला विचारलं की “तुम्ही काय करताय? मला सांगू शकाल का?” ती नम्रपणे म्हणाली, “मी येशू ख्रिस्ताचा जप करतेय” हे ऐकून त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याची उत्सुकता वाढली. तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. “अहो पण इथे तुम्ही मॅच बघायला आला आहात ना? मग जप?” तिला त्याची उत्सुकता कळली.

ती बाई म्हणाली, “मी मिसेस ब्रॅडमॅन आहे. माझे मिस्टर खेळत असताना मी नेहमी जप करत असते. त्यांनी चांगला खेळ खेळावा, अनेक लोकांच्या अपेक्षा असतात त्यांच्याकडून. त्या अपेक्षा पूर्ण व्हायला हव्यात. म्हणून मी जप करतेय.”
खंडू रांगणेकर त्या बाईकडे मिश्कीलपणे पाहत म्हणाला, “अहो तुम्ही डॉन ब्रॅडमॅनच्या पत्नी असताना जप करत आहात. जर खंडू रांगणेकरच्या पत्नी असता तर तुम्ही काय काय केलं असतं? रांगणेकर नेहमीच राखीव खेळाडू असतो भारतीय टीममध्ये.” मिसेस ब्रॅडमॅनने हसतच विचारलं, “कोण आहे खंडू रांगणेकर?” “मीच आहे” तो म्हणाला. यावर मिसेस ब्रॅडमॅनला हसू आवरता आलं नाही. तिला रांगणेकरचा विनोद खुप आवडला.
हेही वाचा – उन्हाच्या कटाविरुद्ध लढणारे नागराज मंजुळे
रात्री हा विनोद तिने आपल्या नवर्याला म्हणजेच सर डॉन ब्रॅडमॅनला सांगितला. त्यांनाही खंडू रांगणेकरचा विनोद भारीच आवडला. त्यानंतर सकाळी ब्रॅडमॅन खंडू रांगणेकरला शोधत आले व त्यानंतर त्यांची खूप चांगली मैत्री झाली. ते बर्याचदा निखळ गप्पा मारत. सर ब्रॅडमॅन अगदी रांगणेकरच्या वाढदिवसाला पत्र वगैरे पाठवायचे, फोन करायचे, एका विनोदामुळे इतकी घट्ट मैत्री होती त्यांची.
कसा वाटला हा क्रिकेटचा किस्सा?
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


Pingback: उन्हाच्या कटाविरुद्ध लढणारे नागराज मंजुळे - Jayesh Mestry