Ganapati Decoration and chalachitra Script: गणेश चतुर्थीला द्या सजावट आणि चलचित्राच्या माध्यमातून अवयवदानाचा संदेश

Ganapati Decoration and chalachitra Script: गणेश चतुर्थीला द्या सजावट आणि चलचित्राच्या माध्यमातून अवयवदानाचा संदेश

गणपती आणि डेकोरेशन आयडिया:

जसं बोधी वृक्ष असतं, तसं अवयवदानाचं वृक्ष आहे आणि त्या वृक्षावर फळांच्या ऐवजी विविध अवयव आहेत. (या वृक्षाला “जीवन वृक्ष” असं नाव ठेवता येईल) जसे ह्रदय, मूत्रपिंड, डोळे, यकृत इत्यादी. (किंवा पारंबी लटकलेल्या दाखवू शकता, ज्यावर अवयव आहेत) आणि त्या वृक्षाखाली गणपती बाप्पा प्रवचन करण्याच्या अवस्थेत बसलेत, जणू दे अवयवदानाचा संदेश सर्वांना सांगत आहेत. बाप्पाच्या गळ्यात ऑर्गन डोनेशनची ग्रीन रिबिन असलेला हार आहे. आणि अशा लहान लहान रिबिन्स (कापड किंवा वेस्ट कागद) बनवून ठेवायच्या व जे दर्शनाला येतील, त्यांना बाप्पाच्या प्रसादासोबत ह्या रिबिन्स द्यायच्या, जेणेकरुन ते अवयवदानाचा संदेश घरी घेऊन जातील.

चलचित्र:

निवेदन: सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम… सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. गणपती म्हणजे श्रद्धा, भक्ती, शक्ती आणि शुभारंभाचं प्रतीक. गणपती बाप्पा म्हणजे प्रत्येक संकटात धीर देणारा मित्र. ठेच लागली तर सुश्रुषा करणारी आई. चुकलं तर मार्गदर्शन करणारे वडील. बाप्पा सगळीकडे आहे. अनेकदा तो जीव वाचवणार्या डॉक्टरांच्या रुपातही येतो. दरवर्षी बाप्पा येतो, विघ्न दूर करतो, आणि आयुष्याला नवी दिशा देऊन जातो. मात्र जाताना तो आपल्याला शिकवणही देऊन जातो. या वर्षी सुद्धा बाप्पा आपल्याला महत्वपूर्ण अशी शिकवण देणार आहे. जिवनदान… म्हणजेच अवयवदान… होय! अवयवदान हे खर्या अर्थाने जीवनदान आहे. अवयव दान करुन तुम्ही कुणाचे तरी जीवन वाचवू शकता. तुम्ही कुणाचे तरी ह्रदय होऊन धडधडू शकता किंवा तुमच्या नजरेने कुणीतरी हे जग पाहू शकतो. खोटं वाटतंय? चला तर आपण हे एका गोष्टीद्वारे समजून घेऊया. ही गोष्ट आहे चिनूची… (चिनूवर स्पॉट, ती रुग्णालयात बेडवर झोपलीय, बाजूला तिची आई आहे.) चिनू ही ८ वर्षांची गोडुली मुलगी आहे. तिचं बाप्पावर खूप प्रेम आहे. तिच्याही घरात दर वर्षी बाप्पा येतात, पण या वर्षी ती बाप्पाला पाहू शकणार नाही. कारण ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तिच्या ह्रदयाला होल आहे. अरेरे! एवढुशी ती पोर, पण या कोवळ्या वयात किती मोठं संकट आलं तिच्यावर… अवयवदानाबद्दल समाजात जागृती नसल्यामुळे तिला ह्रदय मिळणं कठीण जातंय.

सीन १

चिनू: आई, मला खरंच बाप्पाला कधीच पाहता येणार नाही का?

आई: असं काही नाही गं. होईल सगळं ठीक.

चिनू: अगं आई, पण तूच म्हणतेस ना, माणूस मेल्यावर देवाघरी जातो. मग मीही देवाघरी जाईन आणि मग मला रोज बाप्पाला पाहता येईल. हो ना गं आई?

आई: असं बोलू नये गं (आई रडते)…

निवेदन: पाहिलंत ना? या मुलीला जर ह्रदय मिळालं नाही तर तिचा काहीही दोष नसताना हे जग तिला सोडावं लागेल. पण समाजात काही माणसं असतात जी जनजागृतीचं काम करत असतात. त्यापैकी एक म्हणजे अतुल… (अतुलवर स्पॉट. अतुल आणि त्याचे दोन मित्र आहेत.)

हेही वाचा:

सीन २

राजू: अतुल हे कसलं खुळ लागलंय तुला? अरे गणपती डेकोरेशन कसं भन्नाट असलं पाहिजे. अवयवदानाची थीम मजा नाही यार.

रुची: हो ना यार. चल ना एकदम झिकझॅक काहीतरी करुया.

अतुल: नाही. अवयवदानाची थीम ठेवायची नसेल ठेवायची तर मी तुमच्या टीममध्ये न आही असं समजा.

राजू: अरे पण का?

रुची: हो ना, इतका हट्ट का करतोस?

अतुल: तुम्हाला माहितीय? दरवर्षी ५ लाख लोक अवयव न मिळाल्यामुळे दगावतात. दर वर्षी १ लाख ७५ हजार लोकांना मूत्रपिंड आणि ५० हजार लोकांना यकृताची गरज असते. पण भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात तेही मिळू नये? मग काय करायचंय महासत्ता होऊन? अवयव दान करुन १ दाता किमान ८ जणांचे प्राण वाचवू शकतो आणि टिश्यू दान करुन ७५ पेक्षा अधिक लोकांचे जीवन सुसह्य करु शकतो. (आता भावूक होतो) मी खूप लहान होतो तेव्हा माझी ताई वारली. तिला ह्रदयाची गरज होती, पण शेवटपर्यंत… (थोडा रडतो. पण नंतर नॉर्मल होतो) ताई… आय मिस यू ताई…

रुची: रडू नकोस. आम्ही तुझ्यासोबत आहोत. आपण अवयदानाची थीम ठेवूया. तुझा हा संदेश सर्वांपर्यंत पोहचवूया..

अतुल: हा माझा संदेश नाही. हा बाप्पाचा संदेश आहे. तोच आपल्याला शिकवण देतो, बुद्धी देतो.

सीन ३

(गणपती मंडळ. चिनूची आई अतुल व मित्रांच्या गणपती दर्शनाला आलीय. फ्रेममध्ये आई, अतुल, रुची, राजू आहेत)

आई: गणपती बाप्पा… माझी चिनू तुझी खूप मोठी भक्त आहे. दिवसभर बाप्पा बाप्पा करत असते. पण तिच्या ह्रदयाला होल आहे. तिला ह्रदयाची गरज आहे. सगळे रस्ते बंद झाले म्हणून तुला शरण आले. आता तूच वाचव बाप्पा..

अतुल: काय म्हणालात काकू? तुमच्या मुलीच्या ह्रदयाला होल आहे?

आई: हो रे बाळा.

रुची: तुम्ही काळजी करु नका. आम्ही करतो काहीतरी.

आई: तुम्ही काय करणार?

अतुल: आम्ही गणपती बाप्पाच्या माध्यमातून सोशल मीडियावर आवाहन करु. बाप्पा नक्कीच मदत करेल.

आई: खरंच हे शक्य आहे?

राजू: हो काकू… बाप्पावर विश्वास ठेवा..

(आता लाईट्स ब्लिंक होतेय आणि फक्त आवाज ऐकू येतो.)

अतुल: हाय फ्रेंड्स मी अतुल. आज मी तुमच्यासमोर महत्त्वाचं आवाहन करणार आहे. एका ८ वर्षांच्या मुलीला ह्रदयाची गरज आहे. जर कुणी डोनर असेल तर या नंबरवर कॉल करा… अवयवदान, एका मुलीला नवीन जीवन देऊ शकेल. सो प्लिज कॉल. इट्स अ हम्बल रिक्वेस्ट. फोर द सेक ऑफ चिनू. फोर द सेक ऑफ बाप्पा. गणपती बाप्पा मोरया…

(लाईट्स ब्लिंक होतेय. यात ऍंब्युलेन्सचा आवाज. थोंडा गोंधळ आणि ऑपरेशनचे आवाज टाकता येतील.)

सीन ४:

(आता गणपतीच्या दर्शनाला चिनू आणि आई आलीय. सोबत राजू, अतुल आणि रुची पण आहे.)

आई: हे बघ, या दादांमुळे आणि दीदीमुळे तू बाप्पाचं दर्शन घेऊ शकलीस.

चिनू: थॅंक्यू दादा, तुम्ही नसता तर आज मी बाप्पाला पाहू शकले नसते.

अतुल: थॅंक्यू मला नको. बाप्पाला म्हण. ही आयडिया बाप्पानेच मला सुचवलीय.

चिनू: म्हणजे बाप्पा तुझ्याशी पण बोलतो?

रुची: हो म्हणजे काय, आमचा फ्रेंड आहे तो.

चिनू: माझाही फ्रेंड आहे. नो नो… बेस्ट फ्रेंड… थॅंक्यू बाप्पा. आय लव्ह यू बाप्पा…

निवेदन: पाहिलंत का गणेश भक्तांनो, अवयवदानाचं महत्व. जर अतुलने पुढाकार घेऊन अवयवदानाबद्दल जनजागृती केली नसती तर आज चिनू आपल्यात नसती. म्हणूनच सांगतो यज्ञात आहुती देणं जितकं पवित्र, तितकंच पवित्र आहे एखाद्याला जीवनदान देणं. एका व्यक्तीचे अवयवदान आठ जीव वाचवू शकतो. तर मग चला… या गणेशोत्सवात, आपण केवळ आरास करू नये, तर विचारांचीही आरास करूया. अवयवदान करुन आणि त्याबाबद जनजागृती करुन लोकांना जीवनदान देऊया. अवयवदान म्हणजे मृत्यू नंतरचं अमरत्व! अवयवदान हाच बाप्पाचा खरा प्रसाद!”

(मग लाईट्स येते आणि घरच्या बाप्पाचं दर्शन होतं.)

संकल्पना आणि लेखन: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *