सोनलचे मात्र बारा वाजले!

सोनलचे मात्र बारा वाजले!

सोनलचा आज वाढदिवस होता. तिला मनापासून वाढदिवस बाहेर साजरा करण्याची इच्छा होती. तिने ठरवलं आपली ही इच्छा नवर्‍याला सांगायची. हा विचार करत होती, तेव्हाच तिची सासू आली आणि म्हणाली, “काय सुनबाई… आज वाढदिवस ना? हॅपी बर्थडे, बरं का…” सोनलचा चेहरा फुलला. सोनलचं नशीब आज जास्तंच जोरात होतं. कारण चक्क सासूबाईंनी सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या होत्या. संडे असल्यामुळे पतीदेव अजून उठले नव्हते. सासू पुढे म्हणाल्या, “आज तुझा वाढदिवस आपण धुमधडाक्यात साजरा करु. घरातल्याघरात करु, पण अगदी रंगत येणार बघ”. सासूबाईंचे हे वाक्य ऐकताच सोनलचा फुललेला चेहरा कोमेजू लागला. कारण घरातल्या घरात पार्टी करायची म्हणजे. जेवण घरातंच करावं लागणार. रोज घरातल्या माणसांचं जेवण करावं लागतं. आज तर पाहूण्यांचंही जेवण करावं लागणार. तिनं मनावर दगड ठेवून सासूबाईंना “हो” म्हटलं आणि मनातल्या मनात स्वतःच्या नवर्‍याच्या नावाने बोटं मोडत राहिली, “जरा लवकर उठला असता तर काय झालं असतं.”

सासूबाईंनी तशी जय्यत तयारी केली होती. घरंही छान सजवलं होतं, सासूबाईंचा उत्साह गगनात मावत नव्हता. हे पाहून सासूबाईंच्या मुलाला म्हणजेच सोनलच्या नवर्‍याला त्याच्या आईचा खुपच अभिमान वाटू लागला. तो हळूच सोनलच्या कानात पुटपुटला, “पाहिलंस.. तू नेहमी माझ्या आईला नावं ठेवत असतेस ना.. बघ ती तुझ्या वाढदिवसासाठी किती उत्साही आहे ते बघ जरा.” सोनलने डोळे वर करुन त्याच्याकडे पाहिलं. पण नवराच तो, तिच्या डोळ्यातले भाव त्याला कळलेच नाही. संध्याकाळ झाली पाहूणे यायला लागले. बिच्चारी सोनल स्वयंपाक करुन थकली होती.

हेही वाचा:

भाज्या चिरुन तिचे हाथ इतके दुखायला लागले होते की आता केक कापण्यासाठी पुन्हा सुरी हातात घेणे म्हणजे तिला जणू जुलूमंच वाटू लागला. शेवटी तिने केक कापला… हॅपी बर्थडे झाला. सोनल सुगरण होती म्हणून जेवणंही छान झालं होतं. सासूबाईंनी अगदी चटामटा बोटे चाटत जेवण फस्त केलं. पण सोनलला मात्र जेवण अळणीच लागलं होतं. पाहूणे गेले, सोनलचा नवरा प्रसन्न चेहरा करीत म्हणाला, “काय सोनल… छान झाली बर्थडे पार्टी.. माझ्या आईचा प्लान होता, शेवटी आई कोणाची आहे…” सोनल उसने हास्य चेहर्‍यावर आणत म्हणाली, “होय, ते तर आहेच.”

मोरीमध्ये भाड्य़ांचा पसारा पडला होता. तिला त्या निर्दयी भांड्यांमध्ये तिच्या सासूचा चेहरा दिसत होता. तेवढ्यात सासूबाई पाठून आल्या व म्हणाल्या, “अगं हे काय करतेस तू? तू भांडी घासणार? तुझा वाढदिवस आहे ना आज.” सासूबाईंचे हे शब्द कानावर पडताच तिला कुणास ठाऊक सासूबाई म्हणजे देवदूतंच वाटू लागल्या… ती सासूचे आभार प्रदर्शन करणार इतक्यात सासूबाई पुन्हा म्हणाल्या, “आज तुझा वाढदिवस आहे ना? मग आज तू भांडी घासणार हे बरं दिसतं का? एक काम कर. आता साडे अकरा वाजलेत. जरा अर्धा तास थांब आराम कर. बारा वाजल्यानंतर ही भांडी घास..” असं म्हणत त्या दयाळू सासूबाई निघून गेल्या. सोनलचे मात्र बारा वाजले होते.

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *