गण्या आणि मन्या तसे सुशिक्षित तरुण. दोघेही एकाच कंपनीत कामाला आहेत. पगारंही चांगला आहे. दिसायलाही दोघे देखणे व चांगल्या घरचे. संध्याकाळी ऑफिस सुटलं की बसस्टॉपवर उभं राहून रोज पोरींना न्याहाळत बसणे हा त्यांचा उद्योग. लाल वाली माझी, पिवळी वाली तुझी, असं म्हणत त्यांची संध्याकाळ मजेशीर जायची.
एखादी नवीन तरुणी दिसली की बस्स.. तिच्याशी कोण जाऊन बोलणार, यावरुन दोघांत पैज लागे. एका संध्याकाळी ते बस स्टॉपवर उभे होते. पण त्यांना न्याहाळण्यासाठी चांगल्या तरुणीच दिसेना. दोघेही वैतगले. त्यांनी विचार केला, जरा थर्टी-नाईनटी मारु आणि घरी जाऊ. पण आज जरा जास्तंच झाली. बस पकडण्यासाठी ते पुन्हा बस स्टॉपवर आले.
हेही वाचा: “संशय कल्लोळ; द सेकंड… – मराठी विनोदी स्कीट”
तर तिथे एक लावण्यवती ललना पाठमोरी उभी होती. लाल रंगाची साडी, काळ्या रंगाचा ब्लाऊज. अहा… गण्या बोल्ला, “मन्या काय पण बोल, मुली ना साडीमध्येच जास्त सुंदर दिसतात यार”. मन्या उत्तरला, “होय ना म्हणून तर आपल्या पूर्वजांनी तशी सोय करुन ठेवली असणार. आपले पूर्वज खरंच खूप महान होते.” दोघांच्याही नजरा तिच्या सौंदर्याला न्याहाळत होत्या. गण्याचा स्वतःवरचा ताबाच सुटला होता त्याचे ओठ पुटपुटले, “अति सुंदर”..
मन्या म्हणाला, “आता मी जाऊन तिच्याशी बोलतोच. लागली हजारची ती सुद्धा मझ्याशी बोलेल.” गण्याने त्याला आठवण करुन दिली की “गेल्या वेळी तू गेला होतास. आता माझी टर्न आहे.” मैत्रीखातर मन्याने हे मान्य केले.
गण्या अतिशय आत्मविश्वासाने त्या मुलीच्या जवळ गेला. ती पाठमोरीच उभी होती. इतकी सुंदर मुलगी वारा सुद्धा तिला स्पर्श करण्यासाठी आसुसलेला होता. गण्याचीही शुद्ध हरपली होती. गण्याने सगळा श्वास रोखून एकदम म्हटलं. “एक्सक्यूज मी मॅडम”….. तिनं वळून पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. तिच्या चेहर्यावर हसू फुलले… मन्या हे सर्व पाहत होता. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. गण्या सुद्धा स्तब्ध झाला होता. गण्याकडे अतिशय आनंदाने पाहत ती लावण्यवती म्हणाली, “दादा.. तू इथे काय करतोयस?”
दुनिया गोल है भाई…
लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री
