“ओ रे मोरा सैंया सायको” या गाण्यावर थिरकणार्या पिढीने कदाचित हिचकॉकचा सायको पाहिला नसेल. मी पहिल्यांदा हे गाणं ऐकलं तेव्हा मला हिचकॉकच्या सायकोची आठवण झाली. साहो हा चित्रपटही पाहिला पण तिचा सैंया सबंध चित्रपटात सायको वाटत नाही. तरी पण हे गाणं चित्रपटात का टाकलं असेल? तसं पाहता याचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. कारण आजकालच्या चित्रपटात गाणी ही मुद्दामून टाकलेली असतात. ती बर्याचदा सिक्वेंसला धरुन किंवा त्या संबंधित नसतात आणि त्या सिक्वेंसचा व गाण्यातील शब्दांचा संबंधही नसतो. असो.
मी हिचकॉकच्या कथा वाचलेल्या आहेत. त्या कथा वाचल्यावर मला असं जाणवलं की आजच्या सीसीटिव्ही कॅमेरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही हिचकॉकच्या कथा संयुक्तिक वाटतात. म्हणजे त्या सर्व कथांमध्ये तुम्ही आजचं आधुनिक तंत्रज्ञान पेरलं आणि तसे गुन्हे घडवले तरी मूळ कथांना धक्का लागणार नाही, इतक्या कसबीने हिचकॉकने या कथा लिहिलेल्या आहेत. या कथा तुम्ही नक्कीच वाचल्या पाहिजेत असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन.
हिचकॉकच्या कथा वाचल्यानंतर मला त्याचे चित्रपट बघण्याची इच्छा झाली. त्याचे चित्रपट क्लासिक चित्रपटात मोडतात. १९२२ चा “नंबर १३” हा त्याचा पहिला चित्रपट आणि १९७६ चा “फॅमिली प्लॉट” हा त्याचा शेवटचा चित्रपट. म्हणजे ५० वर्षांपेक्षाही जास्त काळ त्याने चित्रपटसृष्टीवर राज्य केलं आहे. हिचकॉकच्या कथांची आणि त्याच्या चित्रपटांची खासियत म्हणजे त्याचे पात्र… एखादे पात्र घडवण्याची त्याची स्वतःची एक विशिष्ट शैली होती. कोणतंही पात्र घडवताना त्याचा सायकोलॉजीचा अभ्यास आपल्याला दिसून येतो. आपण एखादा प्रेमपट किंवा अगदी सामान्य कथा असलेला चित्रपट पाहतो तेव्हा सगळे पात्र खूप नॉर्मल असतात. पण हिचकॉकचे चित्रपट पाहताना आपल्याला जाणवतं की प्रत्येक पात्राची एक सायकोलॉजी असते. एखादा माणूस असा का वागत असेल त्यामागे काही ना काही कारण असतंच. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा माणसाच्या मनावर मोठा परिणाम होत असतो. पण ते कारण उथळ असू नये, तर ठोस असावं. नाहीतर तुमची पात्रे आपटतात. हिचकॉकच्या बाबतीत असं होत नाही. हिचकॉक आपल्या सर्व पात्रांना एक वेगळी शैली देण्यात नेहमीच यशस्वी झाला आहे.
१९६० चा सायको हा सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट आहे. सायको नावाच्या रॉबर्ट ब्लॉकच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाचे लेखन जेसेफ स्टेफॅनोने केले असून हिचकॉकने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटासाठी त्याला उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळालेला आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे अमेरिकन चित्रपटांत पहिल्यांदाच हिंसा, पात्रांचं विक्षिप्त वागणं आणि सेक्श्युअलिटीबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करण्यात आला आणि पेक्षकांनी हे स्वीकारलं देखील. हिचकॉकच्या व्हर्टिगो, रेअर व्हिंडो, दि बर्ड्स या क्लासिक चित्रपटांपैकी सायको हा त्याचा सर्वोत्तम चित्रपट असल्याचं मानलं जातं. हा चित्रपट सर्वोत्तम का आहे? तर उत्कृष्ट लेखन, सर्वोत्तम दिग्दर्शन आणि सहज सुंदर अभिनय. त्यात सेक्स, पात्रांचं विचित्र वागणं आणि खून होताना दाखवण्याची पद्धत ही त्या काळी नवीन होती.
मॅरियॉन ही रियल इस्टेट सेक्रेटरी आहे. सॅम नावाच्या मुलासोबत तिचं अफेअर आहे. पण सॅमच्या अंगावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे ते लग्न करु शकत नाही. मॅरियॉन त्याला याबद्दल जाणीवही करुन देते. दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, लग्नही करायचंय पण पैशांचं सोंग घेता येत नाही ना… मग मॅरियॉनच्या आयुष्यात एक असा प्रसंग येतो, ज्यामुळे ती स्वतःचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं आयुष्य बदलून टाकू शकते. एक क्लाइंट तिला ४० हजार डॉलर कॅश देऊन जातो आणि तिची नियत फिरते. हे पैसे जर तिने चोरले तर दूर कुठेतरी निघून जाऊन ती सॅमसोबत आनंदी आयुष्य जगू शकते.
Alfred Hitchcock‘s Psycho (1960) Trailer Click here:
आता इथे पात्राचं वैशिष्ट्य दिसतं. अडचणीत सापडलेला माणूस नीतिमत्ता धाब्यावर बसवतो. त्या अगतीक क्षणी माणूस वेगळाच वागतो. मुळात तसा त्याचा स्वभावही नसतो, गुन्हा करणे ही त्याची खूबी नसते. पण परिस्थितीच इतकी बिकट असते की ती गुन्हा करायला भाग पाडतेच. मॅरियॉन पैसे घेऊन सॅमच्या घराकडे पळते. तिला वाटतं की आपलं आयुष्य बदलून जाईल पण तिला या जगातूनच एक्झिट घ्यावी लागते. तिचं आयुष्यच संपतं.
इथे कथेबद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते की जर तिने पैसे चोरले नसते तर ती सुखाने आयुष्य जगू शकली असती. पण ती पैसे चोरते आणि तिचा खून होतो. महत्वाची बाब म्हणजे पैशांसाठी तिचा खून होत नाही. तिच्याकडे पैसे आहेत म्हणून पैसे पळवण्यासाठी तिला कुणी मारत नाही. तर मारण्यामागचं कारण अगदीच वेगळं आहे. पण तिने पैसे चोरले, ती पळाली म्हणून ती खून्यापर्यंत येऊन पोहोचली. पैशांसाठी खून झाला नसला तरी पैशांमुळे खून झालेला आहे. हा तिच्या नशीबाचा भाग होता. जेनेट लीघने मॅरियॉनची भूमिका साकारली आहे आणि तिला बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेसचा पुरस्कारही मिळालाय. सायकोचं महत्वाचं पात्र म्हणजे नॉर्मन बेट्स… नॉर्मनची भूमिका ऍंथोनी पेर्किन्सने साकारलीय.
सैराट चित्रपटात जेव्हा हिरो, हिरोइनचा खून होतो आणि लहान मुलाच्या पावलाचे ठसे उमटतात, त्या सीनचं खूप कौतुक झालं होतं. खासकरुन त्या सीनवर विशेष रिव्ह्यू लिहिण्यात आले होते. याची आठवण करुन देण्याचं कारण म्हणजे सायको चित्रपटातील दोन सीन्सचा जास्त बोलबाला झाला होता. एक म्हणजे मॅरियॉनचा खून होतानाचं दृश्य… सुंदर, सेक्सी मॅरियॉन आंघोळ करतेय. ते दृश्य बघताना आजही लोक उत्तेजित होतात. आज पॉर्न म्हणा किंवा वेब सिरीजच्या युगात सेक्स खूप कॉमन झालाय पण तरी मॅरियॉनला आंघोळ करताना बघायला वेगळीच मजा येते आणि आंघोळ करत असताना अचानक शिकारी तिच्यावर झडप घेतो आणि तिला चाकूने भोसकतो. हे तिच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी अनपेक्षित असतं म्हणून हे दृश्य अगदी अंगावर येतं. यासाठी वापरलेलं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा भारी आहे. दुसरं दृश्य जेव्हा लीला क्रेन (व्हेरा माइल्स) नॉर्मनच्या आईला पहिल्यांदा पाहते, ते दृश्य सुद्धा सुंदर साकारलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो.
भूतांच्या चित्रपटांमध्ये हॉरर दृश्य रंगवणं त्या मानाने सोपं असतं. कारण भूत म्हटलं की आपसूकच भिती वाटते. पण थ्रिलर किंवा क्राईम सिनेमा बघताना उत्सुकता जाणवते, तरी भिती वाटेल याची शाश्वती नाही. मला आवर्जून सांगावसं वाटतं की हिचकॉकचा सायको आपल्याला घाबरवतो. चित्रपट एका वेगळ्याच नोटपासून सुरु होतो आणि हळू हळू तो गुंतत जातो. चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसतसा तो वर चढत जातो आणि पुढे पुढे तो अंगावर येतो… हिचकॉक हा माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक आहे. त्याचं स्त्री पात्र सुंदर आणि सेक्सी असलं तरी सेक्सपुरती ती मर्यादित राहत नाही. ती चित्रपटाचा एक अविभाज्य भाग असते. शृंगार, सौंदर्य हे स्त्रीचे दागिने आहेत याची हिचकॉकला पूर्ण जाणीव होती. म्हणूनच त्याचे स्त्रीच्या सौंदर्याचा पुरेपूर उपयोग केलेला आहे. पण तो उपयोग करताना आपली कथा भरकटणार नाही याकडे हिचकॉकचं नेहमीच लक्ष होतं. कोणताही प्रसंग हा कथेच्या अनुषंगाने आला पाहिजे यावर त्याने नेहमीच जोर दिलेला आहे.
Watch Alfred Hitchcock‘s Psycho Full Movie
https://www.primevideo.com/detail/Psycho/0M6ILA9VIEWJKZQ3I1XHJ323NH
सायको चित्रपटाचं रहस्य का आहे? मॅरोयॉनचा खून का होतो? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सायको नक्की पाहा. युट्यूबवर किंवा कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट सहज उपलब्ध आहे. चित्रपट पाहिल्यावर तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा…
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री


Pingback: या भूताच्या प्रेमात पडाल; एका घोस्टची गोष्ट “घोस्ट १९९०” - Jayesh Mestry