या भूताच्या प्रेमात पडाल; एका घोस्टची गोष्ट “घोस्ट १९९०”

या भूताच्या प्रेमात पडाल; एका घोस्टची गोष्ट “घोस्ट १९९०”

भूत म्हटलं की भीती… असं एक चित्र आपल्या समोर निर्माण झालेलं आहे. किळसवाणे चेहरे, चित्र-विचित्र आवाज आणि काय काय… पण १९९४ ला अभय नावाचा एक चित्रपट आला होता. अनू कपूर ह्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि नाना पाटेकर भूताच्या भूमिकेत होते. पण हा भूत मात्र खूप गोड होता. हा भूत मुलांना घाबरवण्याचा प्रयत्न करायचा पण मुलं काही घाबरेना. असाच लहान मुलांचा अमिताभ बच्चन ह्यांचा भूतनाथ हा चित्रपट सुद्धा आहे. सांगायचं तात्पर्य की भूत म्हणजे भीती असं चित्र आपण उगाच निर्माण केलेलं आहे. भूत झपाटतं, अंगात येतं, घाबरवतं आणि आपलं अस्तित्व उध्वस्त करतं अशाप्रकारचे अनेक चित्रपट आपण पाहिलेले आहेत. चित्रपटाव्यतिरिक्त खर्‍या खुर्‍या जीवनात जर भूताचा विषय निघाला तरी अनेकांना भीती वाटते. त्यात चित्रपटांतून भूताचं अस्तित्व इतकं भयंकर रंगवलेलं असतं की ते दृश्य आठवूनही धडकी भरते.

पण अभय, भूतनाथ सारख्या चित्रपटात भूतांबद्दल वेगळा विचार करण्यात आलेला आहे. भूत गोड असू शकतं, भूतालाही भावना असतात, ते उगीच कुणाला त्रास देत नाहीत असे दृश्य या चित्रपटांत रंगवलेले आहेत. शाहरुख खान, ऊर्मिला मांतोंडकर आणि नासिरुद्धिन शाह ह्यांचा चमत्कार हा चित्रपट सुद्धा अशाच धाटणीचा आहे. चमत्कार या चित्रपटाची साधारण कथा अमेरिकेच्या ब्लॅकबर्ड्स घोस्ट या चित्रपटासारखी आहे. या चित्रपटांची आठवण काढायचं कारण म्हणजे आज आपण १९९० साली प्रदर्शित झालेल्या घोस्ट या अमेरिकन चित्रपटाबद्दल चर्चा करणार आहोत.

Ghost (1990) Original Trailer

चित्रपटाचं नाव जरी घोस्ट असलं तरी हा हॉरर चित्रपट नाही. हा एक रोमॅंटिक थ्रिलर आहे. हॉलिवूडच्या अनेक रोमॅंटिक चित्रपटांपैकी एक क्लासिक सिनेमा म्हणून या चित्रपटाची नोंद होऊ शकते. इतकी सुंदर कलाकृती आहे ही. प्रेमी युगुलांमधील प्रेमाची जी भावना आहे ती यात सुंदर रेखाटली आहे. आपण बर्‍याचदा खर्‍या प्रेमाबद्दल आणि खोट्या प्रेमाबद्दल चर्चा करत असतो. पण खरं प्रेम म्हणजे काय हे या चित्रपटात खूपच सुंदर पद्धतीने दाखवलंय. सॅम हा बॅंकर आहे आणि मॉली ही कुंभार काम करते. ती जितकी सुंदर दिसते तितक्याच सुंदर मडकी, मूर्ती तयार करते. बॅंकर आणि कुंभार असा हा अजब जोडा. सॅम आणि मॉलीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. त्यांच्यामधील प्रेमाचे प्रसंग (बोल्ड सीन्स) खूप सुंदर पद्धतीने रंगवण्यात आले आहेत. मॉली मडकं घडवत असते तेव्हा त्यांच्यामध्ये अचानक घडलेला रोमान्स असो, किंवा सहज एकमेकांना किस करणं असो किंवा अगदी त्यांचं एकमेकांकडे प्रेमाने पाहणं असो.

मॉली आणि सॅम एकमेकांसोबत खूप खुश आहेत. ते एका नवीन घरात राहायला येतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडते ज्याने त्यांचं आयुष्यच बदलून जातं. मॉली आणि सॅम रस्त्यावरुन जात असताना एक गुंड त्यांना त्रास देतो. सॅम आणि गुंडामध्ये झटापट होते. गुंड गोळी झाडतो… आणि पळतो… तसा सॅम त्याच्या मागे धावत जातो. पण गुंड पसार होतो. सॅम धावत पुन्हा आपल्या प्रेयसीकडे येतो तर समोरचं दृश्य पाहून तो थक्कच होतो. समोर त्याची प्रेयसी असते आणि रक्त सांडलेलं असतं. पण ते रक्त मॉलीचं नसून सॅमचंच असतं. सॅमला गोळी लागून तो मेला हे त्यालाच कळलं नाही. म्हणजे गुंडाच्या मागे जो धावत गेला ते सॅमचं भूत होतं. सॅम मॉलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण सॅमचा आवाज मॉलीपर्यंत पोहोचू शकत नाही. आता सॅमचं भूत त्या गुंडाने आपल्याला गोळी का मारली याचा शोध घेतंय आणि शोध घेता घेता त्याला धक्कादायक तथ्य कळतं. हा सस्पेन्स जर जाणून घ्यायचं असेल तर घोस्ट हा चित्रपट पाहायलाच हवा. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

Ghost (1990) Movie Clip – Whoopi Goldberg चा कमाल अभिनय पाहा इथे:

सॅमची भूमिका करणार्‍या पॅट्रिक स्वेझने छान काम केलं आहे. पॅट्रिक खूप हॅंडसम दिसलाय चित्रपटात. प्रेयसीला आपल्या खूनामागचं तथ्य सांगण्याची, तिच्याशी बोलण्याची त्याची धडपड त्याने छान दाखवली आहे. पण डेमी मूरने अफलातून काम केलंय. ती जितकी सुंदर, सेक्सी दिसलीय तितकाच तिने दमदार अभिनय केलाय. डेमी ज्या ज्या फ्रेममध्ये आहे ती फ्रेम अक्षरशः सजलेली वाटते. सॅम असताना आणि सॅम मेल्यानंतर स्वभावात जो अपेक्षित बदल हवा आहे तो डेमीने मस्तच दाखवलाय. तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे ग्लिसरीनचे वाटत नाही हे विशेष. एखादा अभिनेता वा अभिनेत्री शांत असेल, काहीच बोलत नसेल, फक्त विचार करत असेल तर त्या प्रकारचा अभिनय करणं खूपच कठीण काम आहे. तुम्ही जेव्हा एखादा संवाद म्हणता त्यावेळी तुम्ही तो प्रसंग मारुन नेऊ शकता. पण जेव्हा तुम्ही काहीच बोलत नाहीत आणि तुम्हाला अभिनय करायचाय. बरं विशेष हालचाल सुद्धा करायची नाही. असे दृश्य सुद्धा डेमी मूरने जबरदस्त साकारले आहेत. ती एक ताकदवान अभिनेत्री आहे. कॉर्पोरेट ऍनिमल्स नावाचा तिचा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला.

या चित्रपटात एक सरप्राइज आहे आणि ते सरप्राइज म्हणजे व्हुपी गोल्डबर्ग. व्हुपी गोल्डबर्गने या चित्रपटात ओडा नावाच्या बाईची भूमिका केली आहे. ओडा ही भूतांशी संवाद साधते. अनेक लोक तिच्याकडे आपल्या मेलेल्या नातेवाईकांची भेट करवून घेण्यासाठी येतात. या रोमॅंटिक थ्रिलर चित्रपटात प्राण भरला तो व्हुपी गोल्डबर्गने. व्हुपीने कमाल भूमिका केली आहे. यामध्ये तिने विनोदी भूमिका केलीय. पण ती इतकी सिरियस्ली केलीय की तुम्ही तिच्या परिस्थितीशी कन्व्हीन्स होता. व्हुपीला पहिल्यांदा भूताचा आवाज ऐकू येतो तेव्हा तिच्या रिऍक्शन पाहण्यासारख्या आहेत. ती पैशांसाठी हावरट बाई आहे. पण जेव्हा तिच्याकडे खोर्‍याने पैसे चालत येतात आणि तिला ते पैसे नाकारायचे असतात, तेव्हा तिने जे एक्सप्रेशन्स दिलेत ते अफलातून आहेत. मी तर असं म्हणेल की विनोद म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर घोस्टमधल्या व्हुपी गोल्डबर्गचा अभिनय बघायलाच पाहिजे.

हेही वाचा – “मास्टर ऑफ सस्पेन्स” हिचकॉकचा क्लासिक क्राईम हॉरर चित्रपट “सायको”…

सॅम भूत झाल्यानंतर त्याच्या प्रेयसीला त्याला काहीतरी सांगायचं असतं. पण तो तिला दिसत नाही, तिच्याशी बोलू शकत नाही आणि तिला स्पर्शही करु शकत नाही. मग तो काय काय करतो? त्याचा प्रवास कसा जातो. हे पाहणं जितकं गंमतीशीर आहे तितकंच भावनिक सुद्धा. एका रोमॅंटिक चित्रपटात जसं असतं तसं या चित्रपटात हिरो आहे, हिरोइन आहे, व्हीलन आहे… पण यातला व्हीलन हा तुमच्या आमच्यासारखा दिसतो. तो पांढरपेशी समाजातला एक सामान्य माणुस वाटतो. आपण रावण म्हटला की १० तोंडे आठवतात. पण रावण हा सुद्धा इतर राजांप्रमाणेच असणार ना? व्हीलन ही एक प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती चित्रपटात दर्शवलेली आहे.

उत्तम लेखन, उत्तम दिग्दर्शक, सुंदर म्युझिक आणि जबरदस्त अभिनयासाठी हा चित्रपट नक्की पाहा मित्र आणि मैत्रिणींनो… हा टिपिकल रोमॅंटिक चित्रपट मुळीच नाही. काहीतरी वेगळं पाहिल्याचा आनंद नक्कीच मिळेल तुम्हाला. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही या भूताला घाबरणार नाही. उलट हा भूत तुम्हाला हवाहवासा वाटतो. तुम्ही त्याच्यावर प्रेम करु लागता…

कलाकार:
लेखक: ब्रुस रुबिन, दिग्दर्शक: जेरी झुकर, अभिनेते: पॅट्रिक स्वेझ, डेमी मूर, व्हुपी गोल्डबर्ग, टोनी गोल्डव्हिन

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *