शाळेच्या स्पर्धांमध्ये किंवा कार्यक्रमांत म्हणा “मराठी भाषे”वरील हे भाषण

शाळेच्या स्पर्धांमध्ये किंवा कार्यक्रमांत म्हणा “मराठी भाषे”वरील हे भाषण

शाळेच्या स्पर्धांमध्ये किंवा कार्यक्रमांत म्हणा “मराठी भाषे”वरील हे भाषण

माझी मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी…

सुरेश भट म्हणतात जगात अनेक भाषा आहेत. पण ती ती भाषा बोलणारे लोक आपल्या भाषेला कधीच माय म्हणत नाहीत. पण जगाच्या पाठीवर एकटा मराठी माणूस आपल्या भाषेला माय म्हणतो. जशी आई आपल्या बाळाला छातीशी घेऊन दूध पाजते तशी मराठी भाषा आपल्याला ज्ञानरुपी दूध पाजते. म्हणून मराठी माणूस स्वतःला भाग्यवान समजतो, अशी कल्पना सुरेश भटांनी केली आहे.

मराठी ही खूप प्राचीन भाषा आहे. मराठी भाषा कधी निर्माण झाली हे नक्की सांगता येत नाही. चक्रधर स्वामींनी लिहिलेला ’लीळाचरित्र’ हा मराठीतला सर्वात पहिला ग्रंथ मानला जातो. मात्र ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातील महान ग्रंथ मानला जातो. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचा मराठी भावानुवाद आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात संस्कृत या देव-भाषेत असलेली भगवद्गीता मराठीत रुपांतरित करण्यास अनुमती नव्हती. तरी सुद्धा ज्ञानेश्वरांनी बंड करुन ते महान काम करुन दाखवलंच. ज्ञानेश्वरी ही मराठी साहित्यासाठी देवस्वरुप ठरली. कारण पुढे अनेक मराठी साहित्यिक निर्माण झाले आणि ही परंपरा अजूनही अशीच सुरु आहे.

संत चोखामेळा म्हणतात,

“उस डोंगा परी रस नोहे डोंगा |

काय भुललासी वरलिया रंगा ||

” किंवा संत सेनामहाराज म्हणतात, “स्त्रिया पुत्र बंधू पाही, त्याचा तुझा संबंधु नाही. सखा पांडुरंगावीण, सेना म्हणे दुजा कोण” अशा प्रकारची अनेक काव्ये मराठीत रचली गेली. मराठी साहित्य हे अथांग समुद्रासारखं आहे. जसं आपण समुद्राच्या किनार्‍यावर उभे राहुन समुद्र पाहतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की समुद्र संपतच नाही. तसं मराठी साहित्य अमर आहे आणि ज्याप्रमाणे नदी समुद्राला येऊन मिळते, त्याचप्रमाणे संतसाहित्याने नदीची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा:

जसं पाऊस पडल्यावर सगळीकडे हिरवळ पसरते, तसं मराठी भाषेचा वर्षाव झाल्याने अनेक मराठी चित्रपट, संगीत, नाट्यरुपी मनोरंजनात्मक हिरवळ पसरली. म्हणजेच मराठीमध्ये उत्तम चित्रपट, नाटक, संगीत निर्माण झाले. काही लोक असे म्हणतात की मराठी भाषा यापुढे टिकणार नाही. पण जोपर्यंत हा मराठी माणूस पृथ्वीतलावर जीवंत आहे तोपर्यंत मराठी भाषेचा अंत होऊ शकणार नाही. जर आपल्याला मराठी भाषा टिकवायची असेल तर मुलांना इंग्रजी माध्यमात घालण्यापेक्षा मराठी माध्यमात घातलं पाहिजे. म्हणून माझे आई-वडील मला मराठी माध्यमातून शिकवत आहेत. माझे अनेक मित्र इंग्रजी माध्यमात शिकतात म्हणून त्यांचं मराठी थोडं कच्च आहे. ते मराठी बोलताना हिंदी शब्द वापरतात. हे असंच चालत राहिलं तर खरोखर मराठी भाषा नष्ट होईल का? असा प्रश्न माझ्या बालमनाला पडतो.

जोपर्यंत पृथ्वीतलावर शेवटचा माणूस अस्तित्वात आहे, तोपर्यंत मराठी भाषेचे अस्तित्व टिकून राहायला हवे अशी माझी भूमिका आहे. त्यासाठी मराठी माणसाने मराठीतच बोलायला हवं, मराठीतूनच शिक्षण घ्यायला हवं. हॉलिवुडचे अनेक चित्रपट दक्षिण भारतीय भाषेत भाषांतरित (डब) होतात, ते मराठीत भाषांतरित होत नाहीत. कारण मराठी माणूस मराठी भाषेला प्राधान्य देत नाही. म्हणून मराठी माणसाने चालता-बोलता, उठता-बसता, खाता-पिता मराठी भाषेचा ध्यास घेतला पाहिजे. तरंच “माझी मराठी” टिकून राहिल. चंद्रावर डाग आहे, पण मराठी भाषेवर डाग नाही. इतकी मराठी भाषा पवित्र आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

"माझा मराठीचा बोलू कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके |"

लेखक: जयोस्तु जयेश मेस्त्री

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *