(बायको येरझार्या घालतेय. “नवरा अजून का आला नाही याची वाट पाहतेय.”)
बायको: अजून कसा आला नाही हा? फोन पण उचलत नाहीये. त्या मलायकासोबत डेटवर तर गेला नसेल ना? सटवी, नालायक, हलकट, बेशरम… फॅमिली स्कीट आहे म्हणून ह्या सभ्य शिव्या. नाहीतर मराठीत काय शिव्यांची कमतरता आहे का? (ऑडियन्सला) हा! तर मी काय बोलत होते? सटवी… छोटे छोटे कपडे घालून, हाय राकेश, बाय राकेश, जेवलास का राकेश. (चिडवते) तुझ्या नानाची टांग राकेश (रागात). अगं तुला काय करायचंय? राकेश जेवेल, नाहीतर उपाशी राहिल…. हा गेला कुठे?
(तेवढ्यात नवरा दाराची बेल वाजवतो. आणि होलमधून मधून पाहते व रेडी होते)
बायको: आला… आता मी ह्याला सोडय नाही.
नवरा: किती वेळ लागतोय दरवाज उघडायला?
(आता वैतागून दरवाजा ठोकायला जातो नि ती दरवाजा उघडते. धडपडत घरात शिरतो. तर बायको त्याच्या अंगाचा वास घेते.)
नवरा: अगं आता नको. मी खूप थकलोय.
(बायको चापटी मारते)
बायको: मी वास घेतेय!
नवरा: शी! पूर्वी नवरे घरी आले तर बायका आरती ओवाळायच्या. आजकालच्या बायका वास घेतात? वार्स्ट आहे हे वर्स्ट आहे वर्स्ट…
बायको: तुझ्या कपड्यातून परफ्यूमचा वास येतोय.
नवरा: अगं येणारंच, त्याग काय नवीन?
बायको: लेडिज परफ्युमचा…
(नवरा सावध होतो.)
नवरा: छ्या! काय तरीच काय. मी लेडिज परफ्युम नाही वापरत.
बायको: तेच तर… मग कोण वापरतं? ती सटवी?
नवरा: कोण सटवी?
बायको: मलाइका!
नवरा: मलाइका? अगं ती माझी कलिग आहे.
बायको: हहहं! कलीगच्या कमरेवर हात ठेवण्याची प्रथा आहे का तुमच्या ऑफिसमध्ये?
नवरा: काय बोलतेस तू? फालतूगिरी करण्याचा माझा मूड नाहीये हा. नवरा घरी आलाय तर चहा, कॉफी विचारायचं की वास काढत बसायचं?
बायको: प्रूफ आहे माझ्याकडे… (मोबाईलमधला व्हिडिओ दाखवते. नवरा सावध होतो.) आता काय बोलशील.
नवरा: हा व्हिडिओ तुला कोणी पाठवला?
बायको: तुला काय करायचंय? अं. हमारे जासूस चारो तरफ फैले हुए है. सांग, हे काय चालूय?
नवरा: अगं, ऑफिसमध्ये आम्ही नाटक बसवलं होतं. त्यात एक सीन होता डान्सचा… तो असा बॉल डान्स होता… पण हे सगळं खोटंय ना. अगं नाटक होतं ते. खोटंय खोटंय.
बायको: पण कंबर तर खरी होती ना?
नवरा: हा म्हणजे काय. काय कंबर आहे. इतकी बारीक आणि नाजूक… म्हणजे असं… (जीभ चावतो.. आणी वळतो) बोंबला तेज्यायला…
(ती त्याचा खांदा पकडून वळवते. तर तो पुन्हा दुसरीकडे पाहतो. ती पुन्हा तेच करते, तोही तेच करतो. मग ती पुन्हा खांदा वळवते आणि पटकन त्याच्या समोर जाऊन उभी राहते. तो दचकतो)
नवरा: अगं हार्ट अटॅक येईल ना… तुझ्याशी लग्न झाल्यापासून मी न चुकता, रोज हनुमान चालीसा म्हणतो.
बायको: मस्करी करतोस माझी. तू बायकांसोबत लफडी कर. मी तुला आवडतच नाही. (रडायला लागते) उगाच लग्न केलं तुझ्याशी. माझंच चुकलं. मीच वाईटाय.
नवरा: अगं अगं रडतेस का? तुला म्हटलं ना नाटक होतं… तू उगाच संशय घेतेय..
बायको: अच्छा, उगाच संशय घेतेय का मी? बरं! ठिकाय… बघ आता… (असं म्हणत जाते.)
नवरा: आता ही महामाया काय करणार आहे? तरी हिच्या बापाने मला सांगितलं होतं… नाय नाय बाप नाय बाप नाय. बायकोचा बाप हा तीर्थरुप असतो. आणि नवर्याचा बाप, हा बापच असतो. जास्त अपेक्षा ठेवू नका. तर आमच्या आदरणीय पत्नीचे तीर्थरुप, परमआदरणीय सासरेबुवांनी सांगितलं होतं की आमची मुलगी शेरलॉक होल्म्सची फॅन आहे. पण मला काय माहित होतं ही अख्खी डिटेक्टिव्ह एजेन्सी घेऊन घरी येईल. प्रत्येक गोष्टीत हिला काहीतरी संशयास्पद दिसतं, प्रत्येक गोष्टीत. अहो, आंघोळ करताना सुद्धा सारखा दरवाजा ठोकत असते. आता एखादी बाई काय मच्छर होऊन घुसणार आहे का बाथरुममध्ये. मला तर कधी कधी वाटतं की एखादा मच्छर मला चावला तर ती आधी पाहिल, मच्छर मेल आणि की फिमेल आहे. मेल असेल तर भुर्रर्र, जीवनदान… आणि फिमेल असेल तर कोर्टात खेचेल ही तिला. काय सांगता येत नाय… आली आली… मी काय बोललो ते तिला सांगू नका हा. हिने जर मला घराबाहेर काढलं, तर मी तुमच्या घरात येऊन राहिन. सिक्रेट टॉप सिक्रेट…
बायको: हे कोणाला इशारे करतोयस?
नवरा: इशारे नाही करत… म्हणजे मी तुला, तुला इशारा करतोय… इशारों इशारों में दिल लेने वाले, बता ये हुनर तुम ने सीखा कहा से?
बायको: झालं? झालं, स्वस्तातला शम्मी कपूर. हा बघ.. हा बघ… हा तुझा शर्ट आणि हा केस… कोणाचा केस आहे हा?
नवरा: फॉरेन्सिक लॅबला पाठवावा लागेल, त्याशिवाय कळणारच नाही कोणाचा आहे तो?
बायको: फालतू विनोद नाही मारायचे हा? विनोदाला दर्जा असला पाहिजे. सांग हा कोणाचा केस आहे?
नवरा: मला काय माहित.
बायको: तुला नाय माहित? मग तुझ्या शर्टाच्या बटनात आला कसा हा?
नवरा: (केस हातात धरुन) काय रे लबाडा, माझ्या शर्टाच्या बटनात आलाच कसा?
बायको: प्रत्येक गोष्टीत मस्करी. मी इथे खूप सिरीयस आहे. तुझं एका बाईसोबत लफडं सुरु आहे आणि मी हे सहन करणार नाही.
नवरा: अगं काय बोलतेयस तू. बरं, हवं तर तू माझी अग्नीपरीक्षा घे. नको नको अग्नीपरीक्षा नको. हे जरा जास्तच झालं. तू माझी एखादी सत्व परीक्षा घे.
बायको: घेणारच आहे. मी आधीच तयारी करुन ठेवलीय.
नवरा: (टेन्शनमध्ये) नक्की काय करणार आहेस? आगीवरुन चालायला लावणार की जीभेवर जळता कोळसा ठेवणार?
बायको: ऍक्च्युली तेच करायला हवं. पण तुला वाटते तितकी निष्ठूर नाही मी.
(मग बायको त्याला एका खुर्चीवर बसायला लावते.)
बायको: ही खुर्ची साधीसुदी नाही. खर्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करणारी खुर्ची आहे.
नवरा: म्हणजे? जादूची खुर्ची?
बायको: तसंच समज. मी विचारलेल्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं द्यायची. खरं उत्तर दिलंस, तर बेलचा आवाज येईल आणि खोटं उत्तर दिलंस तर भोंग्याचा आवाज येईल.
नवरा: तुझा माझ्यावर विश्वास नाही.
बायको: नाही. आता करुया सुरुवात?
नवरा: माझ्याकडे ऑप्शन आहे का?
बायको: नाही. माझा पहिला प्रश्न. तू माझा नवरा आणि मी तुझी बायको आहे, बरोबर?
नवरा: हा काय प्रश्न आहे. हे सर्वांना माहितीय.
बायको: विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे.
नवरा: होय बरोबर. (बेल वाजते)
बायको: तुझं माझ्यावर प्रेम आहे?
नवरा: माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यासाठी वाट्टेल ते करु शकतो…
बायको: जेवढं विचारलंय तेवढंच बोलायचं. ढाचे देऊ नकोस. या जगात मीच एकटी तुझी बायको आहे?
नवरा: दुर्दैवाने हो. (बेल वाजते)
बायको: काय म्हणालास?
नवरा: हो म्हणालो हो… माझी एकुलती एक लाडकी बायको. (बेल वाजते)
बायको: पुरे… तुझं बाहेर एखाद्या स्त्री सोबत लफडं आहे?
नवरा: नाही गं बाबा. मुळीच नाही. (बेल वाजते)
बायको: मग पुरुषासोबत?
नवरा: ए. काय बोलतेस. मी काय तसला वाटतो का तुला?
बायको: बरं… प्रत्येक वेळी बेल वाजली, पण हा खरं बोलतोय. म्हणजे मी उगाच संशय घेतला… सॉरी माझ्या राजा. पण माझा संशयी स्वभाव काही केल्या जात नाही.
नवरा: अगं हरकत नाही. माझ्यासारख्या हॅंदसम नवर्याच्या बायकोला असलं टेन्शन असणारच. (बायको वाईट तोंड करते) पण मी तुला माफ केलं. आता यापुढे माझ्यावर संशय घ्यायचा नाही. कळलं?
बायको: हो रे बाबा कळलं…
(ती त्याला मिठी मारते. तेवढ्यात सारखा सारखा भोंग्याचा आवाज ऐकू येतो.)
बायको: हा आवाज कुठून येतोय?
नवरा: (नवरा टेन्स्ड) ते, काही नाही… काही नाही…
बायको: काही नाही. कसं. तुला येत नाहीये का आवाज?
नवरा: छे छे. कुठेय. नाही येत.
बायको: अरे येतोय, नीट ऐक…
नवरा: अगं बिल्डिंगखालून येत असेल, ट्रकला नसतो का असा भोंगा…
बायको: नाही नाही. आपल्या बेडरुममधून येतोय.
नवरा: अरेच्या! अख्खा ट्रक आपल्या बेडरुममध्ये घुसवला…
(तेवढ्यात एक लहान मुलगा किंवा एखादा आर्टिस्ट लहान मुलाची ऍक्टिंग करेल, तो बाहेर येतो. त्याच्या हातात भोंगा आहे.)
बायको: बाळा, हा भोंगा तुला कुठून मिळाला?
मुलगा: काल बाबांनी मला खेळायला दिला भोंगा. म्हणाले आईला नको सांगूस. सिक्रेट गिफ्ट आहे.
(बायको नवर्याकडे रागाने बघते)
बायको: तरीच बलले, प्रत्येक वेळी बेल वाजली. आता तू गेलास…
नवरा: ये वेडे… नाही गं… अपने हातो से अपना सुहाग मत उजाडो. ए नको ए नको ए नको…
(असं म्हणत नवरा पळ काढतो आणि बायको त्याच्या मागे जाते)
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

