आपण सर्वांनीच जादूचे खेळ पाहिलेले आहेत. शालेय जीवनात आपण एकदा तरी जादूचे खेळ पाहतोच. अर्थात ते खेळ खूप बेसिक लेव्हलचे असतात. लहान मुलांना आश्चर्य वाटेल इतके बेसिक्स जादू असतात. पण याही पलीकडे ह्रदयात धडकी भरवणारे जादूही अस्तित्वात आहे. मोठ्या मंचावर या जादूच्या खेळांचा प्रयोग होतो. काही इंग्लिश चॅनेल्सवर जादूचे प्रयोग दाखवले जातात. जादूगार एका विशिष्ट कपड्यामध्ये वावरत असतो. त्याचा स्वतःचा एक ड्रेसकोड असतो. ते वेगळे कपडे घालतात कारण त्यांना प्रेक्षकांपेक्षा व सहकार्यांपेक्षा वेगळं दिसायचं असतं. आपल्याच वेशातला माणूस जर आपल्याला जादू दाखवायला लागला तर कदाचित आपल्यावर त्याचा प्रभाव पडणार नाही. तो त्याच्या कपड्यांवरुन आधी सायकॉलॉजिकली तुम्हाला त्याच्यासोबत घेऊन जातो. ही सायकॉलॉजी सेट करण्यासाठी वेगळ्या धाटणीचे कपडे महत्वाचे असतात.
आपल्याला जादूगारांबद्दल कुतूहलता वाटत असते. आपल्याला माहिती असतं ते आपल्याला फसवतायत, ती जादू ही जादू नसून एक टेक्निक आहे, ट्रिक आहे. पण आपल्याला स्वतःला फसवून घ्यायचं असतं. जर आपण बुद्धिवादाने जादूच्या प्रयोगाकडे पाहिलं तर आपलं मनोरंजन होणार नाही. म्हणून आपण स्वतःच सरेंडर करतो. तरी आपली त्याच्याबद्दलची कुतूहलता कमी होत नाही.
तुम्ही कधी विचार केलाय? की जादूगारांचं आयुष्य कसं असतं. जादूचे प्रयोग कसे तयार केले जातात? एखाद्या ऍक्टमधलं सिक्रेट लपवण्यासाठी ते काय काय करतात? एखादी ट्रिक तयार करण्यासाठी ते कोणत्या थराला जातात? त्यांचं आयुष्य किती रिस्की असतं? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही क्रिस्तोफर नोलनचा दि प्रेस्टिज हा चित्रपट नक्कीच पाहायला पाहिजे. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन क्रिस्तोफर नोलन यांनी केलं असून त्यांनी व त्यांचे बंधू जोनाथन नोलन यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. धूम ३ या चित्रपटाचा बेसिक थॉट या चित्रपटावरुन घेतला आहे. अर्थात दि प्रेस्टिज हा सर्वार्थाने उजवा आहे.
ही कथा आहे दोन तरुण जादूगारांची… ऍंजियर आणि बॉर्डन हे दोन तरुण जादूगार जॉन कटर या मोठ्या जादूराच्या हाताखाली काम करतायत. ऍंजियरची बायको ज्युलिया सुद्धा त्यांच्यासोबत काम करतेय. वॉटर टॅंक ट्रिक करताना बॉर्डन ज्युलियाला अशा प्रकारे गाठ बांधतो की तिला ती गाठ सोडवता येत नाही आणि टॅंकमध्ये बुडून तिचा मृत्यू होतो. ऍंजियर या अपघातासाठी बॉर्डनला आपराधी मानतो आणि तेव्हापासून सुरु होतं या दोन तरुण जादूगारांमधील द्वंद्व…
ऍंजियर हा एक चांगला जादूगार असला तरी त्याला बॉर्डनच्या ट्रिकविषयी खूप कुतूहल आहे. बॉर्डन आणि ऍंजियर बर्याचदा एकमेकांच्या ट्रिक्स निकामी करण्यासाठी वेश बदलून परस्परांच्या शोमध्ये येतात आणि शो उधळून लावतात. ते एकमेकांचे शत्रू झालेत. जॉन कटर ऍंजियरची साथ देतो. ऍंजियरला आपल्या जादूमध्ये काहीतरी कमतरता आहे असं जाणवतं म्हणून तो वेगळे ट्रिक्स शिकण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी निकोल टेस्ला या सायंटिस्टपर्यंत येऊन पोहोचतो… हा प्रवास खूप मोठा आहे. ऍंजियर कशाप्रकारे नवनवे ट्रिक्स शोधून काढण्याचा प्रयत्न करतो आणि बॉर्डनला हरवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. जगणं, मरणं या पलीकडे तो गेलाय. बॉर्डनला हरवणे, त्याच्यापेक्षा मोठा जादूगार बनणे हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे… आणि मग सुरु होतो एक कल्पनेपलीकडचा भयानक खेळ…
मला यात आवडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जादूगारांचं विश्व यात चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे. आपण ज्या जादूगाराला ओळखतो तो फक्त स्टेजवरचा असतो. पण स्टेजच्या मागे सुद्धा जादूगाराचं स्वतःचं असं एक विश्व असतं. तोही माणूस असतो, त्यालाही हेवेदावे असतात, भावना असतात… पण त्यापेक्षा जास्त त्याला महत्वाची असते ती त्याच्या जादूतली ट्रिक. ही ट्रिक तो कुणालाच सांगत नाही, अतिशयोक्ती होईल परंतु अगदी स्वतःलाही सांगत नाही. त्या ट्रिकच्या मागचं सिक्रेट लपवण्यासाठी तो स्वतःचा जीव देऊ शकतो आणि दुसर्याचा जीव घेऊही शकतो. कारण ट्रिकच्या मागचं सिक्रेटच त्याची ताकद असते.
हेही वाचा
बॉर्डनने स्वतःला जादूला वाहून टाकलेलं आहे. बॉर्डनने साराह नावाच्या एका मुलीशी लग्न केलंय. पण जसजसा तो यशाच्या पायरीवर चढत जातो तसतसा तो विचित्र वागायला लागतो. कधीकधी तर तो अगदीच विरोधाभासी वागतो. म्हणून साराह त्याला कंटाळलीय… बॉर्डनने लग्न केलं आणि त्याच्यामुळे आपली बायको मेली… जे वैवाहिक आयुष्य आपल्याला नाही मिळालं ते आयुष्य बॉर्डनला मिळालं ही खंत ऍंजियरला सतावतेय. एरव्ही लोकांसमोर स्टार जादूगर म्हणून वावरणारे हे दोन जादूगार आपापल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र हरलेले वाटतात. ऍंजियरपेक्षा बॉर्डन हा हुशार आहे, जॉन कटरचं म्हणणं सुद्धा हेच आहे की तो एक अफलातून जादूगार आहे. पण तो स्वतःसोबत एक सिक्रेट घेऊन फिरतो. त्याच्या डायरीमध्ये त्याने काही कोडवर्डमध्ये आपले सिक्रेट लिहून ठेवलेत. पण ते कोड डीकोड करायला कुणालाच जमत नाहीत. इतका हुशार आहे तो. नक्की त्याचं व्यक्तिमत्व काय आहे हे तुम्हाला चित्रपट पाहुनच कळेल.
हा चित्रपट दिसतो तितका सरळ साधा नाहीये. हा एक सस्पेन्स थ्रिलर आहे. चित्रपटाची कथा मांडण्याची पद्धत अप्रतिम आहे. चित्रपट सुरु होतो तोच ऍंजियरच्या मृत्यूने… ज्या प्रकारे त्याची बायको ज्युलिया टॅंकमध्ये बुडून मेली होती. त्याचप्रकारे तोही टॅंकमध्ये बुडून मरतो आणि त्याच्या खूनाचा आळ येतो बॉर्डनवर… इथून चित्रपट फ्लॅश बॅक आणि फ्लॅश फॉरवर्डमध्ये पुढे सरकतो. बॉर्डन, जॉन कटर, ऍंजियर, बॉर्डनचा स्टेज इंजिनियर फॅलॉन, सायंटिस्ट निकोल टेस्ला सगळीच पात्रे काहीतरी गुपिते घेऊन जगतायत असं वाटतं… त्यामुळे ऍंजियरचा खून नेमका कसा झाला, तो बॉर्डननेच केला की कुणीतरी त्याला फसवलंय? हे आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही.
सस्पेन्स चित्रपटाचं सस्पेन्स आधीच उघड झालं की घोळ होतो… चित्रपट पाहताना आपण चित्रपटात गुंतत जातो, प्रत्येक पात्रांवर आपल्याला संशय येतो… बर्याचदा चित्रपटाचा हेतू आपल्याला कळत नाही. म्हणजे ऍंजियरचा खून कुणी केला हे शोधून काढणं चित्रपटाचा हेतू आहे की बॉर्डन आणि ऍंजियर यांच्यातली स्पर्धा की नवी हटके ट्रिक मिळवण्यासाठी ऍंजियर करत असलेले पराकोटीचे कष्ट? पण मला वाटतं की ही सुद्धा चित्रपटाची जमेची बाजू आहे. कारण चित्रपटात जे घडतंय ते खूप थ्रिलिंग आहे. पण का घडतंय हे कळत नाही. ते कळतं शेवटच्या क्षणाला आणि आपण “ऑ!” करुन पाहत राहतो. लेखन, दिग्दर्शन, अभिनयासह टेक्निकल बाबींसाठी आणि विशेषतः जादूच्या प्रयोगासाठी हा चित्रपट नक्कीच पाहा. खरंतर क्रिस्तोफर नोलन हा स्वतःच एक जादूगार आहे. जर तुम्ही हा चित्रपट नाही पाहिला तर तुम्ही एका चांगल्या सस्पेन्स थ्रिलरपटाला मुकाल…
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

