Cars 3 Movie review: रिटायर कधी व्हायचं?; कार्स ३

Cars 3 Movie review: रिटायर कधी व्हायचं?; कार्स ३

एखादा सुपरस्टार, बिजनेसमन, क्रिकेटर, राजकारण किंवा अजून कोणत्याही क्षेत्रातली व्यक्ती असो… माणसाला रिटायर कधी व्हायचं हे बर्‍याचदा कळत नाही. राजकारणात तर आपल्याला हे सहज दिसतं. अर्धी लाकडे स्मशानात गेलेले असताना सुद्धा तो दिग्गज नेता राजकारणात भाग घेतच असतो. असा वयोवृद्ध किंवा एक्सपायरी डेट संपलेल्या व्यक्तीला नवी पिढी आव्हान देत असते. पण तो त्या नव्या पिढीच्या विरोधात उभा ठाकतो आणि आपली उरली सुरली लाज सुद्धा विकून टाकतो. पण नव्या पिढीसमोर त्याचं काहीच चालत नाही. कारण तो नव्या दमाचा, नवा जोश घेऊन आलेला असतो. पण आपली खुर्ची सोडायचीच नाही असा अट्टाहास असणार्‍या त्या एक्सपायरी डेट संपलेल्या व्यक्तीने केलेला असतो. ही परिस्थिती तुम्हाला सगळीकडे दिसून येते. अगदी आपल्या घरात सुद्धा…

आपण अशाच एका एक्सपायरी संपलेल्या सुपरस्टारबद्दल आज बोलतोय… तुम्हाला कार्स ही सीरीज माहिती असेलच. लहान मुलांची अतिशय आवडती सीरीज आहे. माझ्या मुलाला, जयोस्तुलाही कार्सचे कार्टून्स खूप आवडतात. विशेषतः त्या सीरीजमधलं मेटर नावाचं पात्र “ला बोमब्ला बोमब्ला बोम, कसं काय बरं हाय बोमब्ला बोम…” हे गाणं गातो तेव्हा तो हसायचं थांबतच नाही. कार्स ही कार्टून सीरीज आहे. कार्समधले सगळे पात्रे हे कार्स आहेत. चित्रपट कार रेसिंगवर आधारलेला आहे. मॅकक्विन हा सुपरस्टार आहे. अनेक वर्ष तो जिंकतोय… त्याचे अनेक चाहते आहेत. तो स्वतः त्याच ऑरामध्ये जगतोय… म्हणजे त्याचं वय झालंय, पण तो स्वतःला अजूनही तरुण आणि विजेताच समजतो… त्याच्या आजूबाजूचं वातावरणही तसंच आहे. सगळ्यांचाच तो लाडका असल्यामुळे, इतरांनही कळत नाही की त्याचा काळा आता संपत आलाय. पण एक असा प्रसंग घडतो जेव्हा त्याला याची पहिल्यांदा जाणीव होते.

रेसिंग करताना नव्या दमाचा जॅक्सन त्याला मागे पाडतो आणि विजय मिळवतो. कारण त्याच्यासोबत असते नवीन टेक्नॉलॉजी, उत्तर ट्रेनर्स… जॅक्सन त्याला फक्त हरवतच नाही तर त्याला जाणीव करुन देतो की तो आता म्हातारा झालाय. हे मॅकक्विनच्या मनाला खूप लागतं. तो हे स्वीकारायला तयार नाही की त्याचा काळ आता संपलाय. त्याला दाखवून द्यायचंय की तो अजूनही सुपरस्टार आहे. तो पुन्हा रेसिंग करतो तर जॅक्सनमुळे मॅकक्विन चांगलाच इंज्युर्ड होतो… चार महिन्यांनंतर तो जेव्हा बरा होतो, तेव्हा तो पुन्हा रेसिंग करण्यास सिद्ध होतो. पण त्याच्या स्पाऊंसरने आपली टीम स्टर्लिंगला विकली असल्यामुळे तो स्टर्लिंगकडे जातो तर तिथलं दृश्य पाहून तो अवाक होतो. कारण ट्रेनिंग सेंटर आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेलं असतं… या तंत्रज्ञानाकडे त्याने कधीच लक्ष दिलेलं नसतं… त्याला ट्रेनिंग देण्यासाठी क्रूझ या मुलीची (कार) निवड केली जाते. ती आधुनिक पद्धतीने त्याला तयार करण्याचा प्रयत्न करते पण मॅकक्विन हा जुन्या धाटणीतला माणूस त्यामुळे त्याला आधुनिक ट्रेनिंग पचत नाही. क्रूझ सुद्धा त्याला वैतागते… यामध्ये खूप धम्माल आहे… ही धम्माल जाणून घ्यायची असेल तर हा कार्टुन चित्रपट नक्कीच पाहा. आपल्या मुलांसोबत पाहा म्हणजे त्यांनाही मजा येईल आणि दोन वेगवेगळ्या पिढीने पाहण्यासारखाच हा चित्रपट आहे. एक पिढी जी आता संपणार आहे आणि एक पिढी जी आता सुरु होणार आहे. या दोन्ही पिढीने कसं वागलं पाहिजे याच उत्तम उदाहरण म्हणजे कार्स ३…

हेही वाचा – “या भूताच्या प्रेमात पडाल; एका घोस्टची गोष्ट “घोस्ट १९९०”…

आपणही मॅकक्विनप्रमाणेच वागत असतो, एखाद्या क्षेत्रात आपण अनेक वर्षे काम करत असतो, पण आपल्याला याची जानीव मुळीच होत नाही की आपल्या मागोमाग एक नवी पिढी तयार होत असते. हा निसर्ग नियम आहे. आपण त्या नव्या पिढीचं खुल्या दिलानं स्वागत केलं पाहिजे. पण आपण काय करतो? आपण नव्या पिढीशी झुंजतो… अगदी घरचं उदाहरण घ्यायचं झालं तर… एखादी मुलगी जेव्हा लग्न करुन दुसर्‍याच्या घरी जाते, तेव्हा सासू त्या मुलीला स्वीकारत नाही. तिला नेहमीच असं वाटत असतं की आपल्या मुलाला ही नवी मुलगी हिरावून तर घेत नाही ना? आपल्या किचनवर ती ताबा तर मिळवत नाही ना? ती येणारी मुलगी सुद्धा त्याच इम्प्रेशनने वागत असते. दोघांचंही चुकतं… या दोन पिढ्यांना जवळ आणणारा चित्रपट म्हणजे कार्स ३…

मॅकक्विन जॅक्सनला हरवण्यासाठी कसोशिने प्रयत्न करतोय. क्रुझने दिलेल्या आधुनिक ट्रेनिगच्या जोरावर तो पुन्हा रेसिंगसाठी सज्ज झालाय. जॅक्सनला हरवण्यासाठी तो संपूर्ण जोमाने रेसिंगमध्ये उतरतो. पण जॅक्सन त्याला मागे टाकतोच… कारण… अर्थात जॅक्सन हा खूप तरुण आहे… मॅकक्विनच्या शरीरात आता ती ऊर्जा राहिलेली नाही. हे ऐनवेली मॅकक्विनच्या लक्षात येतं आणि तो अचनक क्रुझला आपला नंबर देतो आणि धावायला सांगतो… क्रुझ टेन्शनमध्ये येते. कारण ती ट्रेनर असते, रेसर नाही. पण मॅकक्विनने बर्‍याचदा त्याला ट्रेनिंग देताना पाहिलंय की क्रुझ ही चांगली रेसर आहे. मॅकक्विन तिला विश्वास देतो… तर ती त्याचा नंबर लावून धावते… आणि पहता पाहता ती जॅक्सनला मागे टाकून जिंकते…

अशाप्रकारे जुनी पिढी नव्या पिढीला जागा करुन देते आणि नवी पिढी जुन्या पिढीचा कारभार पुढे नेते. हाच निसर्ग नियम आहे. पण हे आपल्याला कळत नाही आणि आपण उगाच नव्या आणि जुन्या पिढीत द्वंद्व करत राहतो. आपल अहा गैसरसमज दूर करण्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहा…

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *