Ramayana: रामायणम्‌ – खलनायकाचा चित्रपट

Ramayana: रामायणम्‌ – खलनायकाचा चित्रपट
ravana

Ramayana: खरं सांगायचं तर चित्रपट विशेषतः ऐतिहासिक चित्रपट हा काही अभ्यासकांसाठी बनलेला नसतो. तो अभ्यासकांसाठी बनवूही नये. त्यात अतिरंजकता, फिक्शनायझेशन, वेळ प्रसंगी काल्पनिक पात्रे आली पाहिजेत. इतिहास जसाच्या तसा कलेच्या दृष्टोकोनातून मांडला जातो तेव्हा ती कलाकृती फसते. एकाच विषयावरची विविध कलाकृती वेगळी असू शकते. त्यातील पात्रेही भिन्न स्वभावाचे असू शकतात. बाबुजींच्या चित्रपटातील सावरकर आणि रणदीप हुडा यांच्या चित्रपटातील सावरकर भिन्न स्वभावाचे आहेत. बाबुजींचे सावरकर शांत आहेत तर हुडांचे सावरकर आक्रमक आहेत. तसेच विष्णूपंत पागनिस यांनी साकारलेले तुकोबा आणि जितेंद्र जोशी यांची साकारलेले तुकाराम महाराज यांच्यात किती भिन्नता आहे! यावर अभ्यासक बोटे मोडत बसतील. सावरकर असे होते किंवा तसे होते. पण जेव्हा कलाकृती म्हणून कलाकार त्याकडे पाहतो तेव्हा त्याला मनोरंजक हा फॅक्टर बाजूला ठेवून चालत नाही. म्हणूनच रणबीर कपूरच्या रामायणाच्याकडे (Ramayana) पाहताना या लेखापुरता आपण अशा पद्धतीने विचार करु.

रामायण (Ramayana) चित्रपटाचा गाभा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा आहे. देव हे प्रस्थापित आहेत नि असूर विस्थापित आहेत. प्रस्थापित देवांना विष्णू नावाची महाशक्ती मदत करते. विष्णूचा हात देवांच्या मस्तकावर आहे म्हणून त्यांचं फावतं आहे, अशी मांडणी चित्रपटात आली आहे. चित्रपटाची सुरुवात देव-असूर युद्धाने होते. असूर जिंकतच असतात मात्र विष्णूच्या कृपेने इंद्रदेव असूरांना हरवतो आणि लंका देवांच्या ताब्यात येते व कुबेर लंकेचा राजा होतो. देवांच्या राज्यात असूरांची अन्नान्नदशा होते. त्यांना उपाशी मरावं लागतं. म्हणून कैकेसी संगीतात रमलेल्या नुकत्याच वयात आलेल्या आपल्या मुलाला म्हणजेच रावणाला असूरांचा प्रतिशोध घ्यायला सांगते आणि रावण कठोर तपश्चर्या करुन ब्रह्मदेवाकडून देव-असूर-गंधर्व इत्यादींकडू पराभूत होणार नाही असा वर मिळवतो. मात्र मानवाकडून आपण पराभूत होणार नाही हे तो सांगत नाही. मग विष्णू रामाच्या रुपात सामान्य माणूस म्हणून अवतार घेतो. सुरुवातीचे २० मिनिटे नायकाची म्हणजेच रामाची एंट्री नाही. यात चुकीचंही काही नाही.

रजनिकांत यांचे असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात रजनी १५-२० मिनिटांनंतर एंट्री करतात. त्याआधी खलनायक किती मोठा आहे हे दाखवलं जातं. खलनायक मोठा असेल तर नायक त्याला शेवटी पराभूत करतो हे पाहायला चांगलं वाटतं. पण रामायण (Ramayana) चित्रपटातला खलनायक वाईट नाही. तो दिवारमधला अमिताभ बच्चन आहे. म्हणजे त्याला जर चांगलं आयुष्य मिळालं असतं तर तो चांगला झाला असता. मात्र त्याच्या कुळावर अन्याय झाल्याने तो अहंकारी झाला. ’अहंकार’ हा एवढाच दुर्गुण रावणाकडे आहे, असं चित्रपटात दाखवलं गेलंय. म्हणूनच चित्रपटातला नायक कमकुवत ठरतो. यशच्या रावणाचे सगळे प्रसंग उत्तम चित्रित झालेत. पण रणवीरचा राम स्क्रिनवर असतानाचे प्रसंग धिम्या गतीचे आणि थोडेसे कंटाळवाणे आहेत. राक्षसांचं राज्य असताना वन हे डार्क थीमचं आहे आणि रामाने राक्षसांचा वध केल्यावर तेच वन प्रकाशमय आणि हिरवंगार बनतं. त्राटिकाचा वध केल्यावर नदी वाहू लागते, या गोष्टी व्यवस्थित दाखवल्यात. अभिनयाच्या बाबतीत सर्वांनीच चांगला प्रयत्न केलाय. सई पल्लवी आणि रणवीरनेही चांगलं काम केलंय. पण सई खरोखरच सीता म्हणून शोभत नाही. रणवीरने राम साकारण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. पण रणवीर हा चित्रपटाचा हीरो वाटत नाही. म्हणजेच प्रभावी वाटत नाही.

हेही वाचा: मूव्ही रिव्ह्यू : इट (IT) – डर के आगे हंसी है…

खलनायकाची एंट्री जशी धमाकेदार घेतलीय, त्या मानाने नायकाला फारसं फुटेज दिलेलं नाही. नायकाचे सीन्स सुद्धा बटबटीत लिहिले गेलेत. यातला लक्ष्मण हा कॉमेडी करणारा आहे. या चित्रपटाची तुलना निश्चितच प्रभासच्या बाहुबलीशी कराविशी वाटते. यातला भल्लाळदेव हे पात्रही उठावदार आहे. पण नायक अधिक उठून दिसतो. चित्रपटातली गाणी चांगली नाहीत. संगीत बरं आहे. पुन्हा तेच म्हणेन की रावणाकडचं संगीत उत्तम पण राम स्क्रिनवर असताना संगीत प्रभावी वाटत नाही. स्पेशल इफेक्ट्स, व्हीएफएक्स मस्त जमून आलेत. भव्य चित्रपट म्हणून हा वाईट म्हणता येणार नाही. कलाकृती म्हणून प्रामाणिक प्रयत्न आहे. पण तुम्ही रामायण किंवा रामाचं चरित्र बघायला थिएटरमध्ये जाणार असाल तर तुमचा हिरमोड होईल. कारण या चित्रपटातला रावण हा मनाने खूपच चांगला आहे. गरीबांची काळजी करणारा आहे, स्त्रियांचा सन्मान करणारा आहे.

शुर्पणखाचा नवरा विद्युतजिव्हा हा दासीला बळजबरी मांडीवर बसवतो तेव्हा रावण त्याला मर्यादा म्हणजे काय हे शिकवतो. म्हणजे रावण हा मर्यादा-असूरोत्तम आहे! माझ्या मते हा चित्रपटातला खूप मोठा विनोद आहे. शुर्पणखा सुद्धा मनाने चांगली आहे. तिचं रामावर खरं प्रेम असतं म्हणे. मुळात चित्रपटातले व्हिलन लोक इतके चांगले आहेत की चित्रपटात हीरो नसता तरी चाललं असतं. वाचकहो, मी या लेखात ज्या गोष्टी मांडल्यात त्या इतिहास म्हणून, वाल्मिकी रामायण म्हणून किंवा लोकमानसात रुजलेलं राम चरित्र म्हणून मांडलेल्या नाहीत. चित्रपटाच्या दृष्टिकोनातूनच मुद्दे मांडलेले आहेत. अनेक टिव्ही सिरियल्समध्येही इंद्र हा अहंकारी, सत्ता उपभोगणारा दाखवलेला आहे. मात्र अशा मालिकांमध्ये जी मूळ शक्ती आहे, ब्रह्मा-विष्णू-महेश यांना वाईट दाखवलेलं नाही. पण या चित्रपटात मात्र विष्णू हा विस्थापित लोकांवर अन्याय करणार्‍यांची बाजू मांडणारा आहे. त्यामुळे विष्णूचा अवतार राम याचीही बाजू चित्रपटात कमकुवत होते. चित्रपटाच्या शेवटी हनुमानाची एंट्री आहे. चेहरा दाखवलेला नाही. पुढच्या भागाची उत्सुकता यामुळे प्रेक्षकांना लागू शकेल. कला म्हणून हा मनोरंजक चित्रपट आहे. मात्र नितेश तिवारी यांचा रामायण (Ramayana) हा चित्रपट राम चरित्र नसून रावण चरित्र आहे. या चित्रपटातला हा खलनायक शोषितांना मदत करता करता अहंकारी झाला आहे. ही खलनायकाची कथा आहे….

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *